नामदेव मोरे,नवी मुंबई- नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या मोटारसायकल उचलून त्यांच्याकडून जास्तीत जास्त दंड वसूल करण्याची मोहीम तुर्भे वाहतूक पोलीस राबवत आहेत. विशेष म्हणजे, कारवाई केलेल्या वाहनांवरील दंड आकारणी व वसुलीचे काम पोलिसांऐवजी चौकीबाहेरील टोर्इंग व्हॅनचा कर्मचारी करत आहे. पैसेही त्याच्याकडेच द्यावे लागत असून त्याची कोणतीही पावती वाहनधारकांना दिली जात नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी. नो पार्किंगमध्ये किंवा रोडवर उभ्या केलेल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक पोलीस चौकीमध्ये ठेकेदारामार्फत टोर्इंग व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत करणे हे त्यांचे मुख्य कर्तव्य असले तरी प्रत्यक्षात मात्र कार्यक्षेत्रातील प्रत्येक रोडवर दिवसभर फेऱ्या मारून जास्तीत जास्त गाड्यांवर कारवाई करण्यावर भर दिला जात आहे. वाहतुकीला अडथळा ठरत नसणाऱ्या वाहनांवरही कारवाई केली जात आहे. विशेष म्हणजे, टोर्इंग व्हॅनने उचललेल्या वाहनांवर नियमाप्रमाणे कारवाई केली जात नसून त्या व्हॅनवरील पोलीस शिपायाच्या मर्जीप्रमाणे कारवाई होत आहे. टोर्इंग व्हॅनला व्यवसायाचे स्वरूप आले असून अशाप्रकारे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांमध्ये तुर्भे वाहतूक पोलीस आघाडीवर आहेत. सायन-पनवेल महामार्गाच्या सानपाडा उड्डाणपुलाखाली ही वाहतूक चौकी असून त्यांचे कार्यक्षेत्र नेरूळ, जुईनगर, सानपाडा ते तुर्भे इंदिरानगरपर्यंत आहे. तुर्भे ते नेरूळपर्यंतच्या औद्योगिक वसाहतीचाही यामध्येच समावेश होत आहे. आकाश टोर्इंग सर्व्हिस या वाहतूकदारास टोर्इंगचा ठेका दिला आहे. व्हॅन व मनुष्यबळ त्यांच्यामार्फत पुरविले जात असून तीन ते चार वर्षांपासून अनिल जाधव हे वाहतूक कर्मचारी टोर्इंगची जबाबदारी सांभाळत आहेत. जास्तीत जास्त गाड्या उचलून दंडवसुली करण्यासाठी जाधव यांच्यासोबत टोर्इंग व्हॅन कार्यक्षेत्रामध्ये दिवसभर फेऱ्या मारत असते. टोर्इंग व्हॅनने पूर्ण लक्ष मोटारसायकलवर केंद्रित केले आहे. चारचाकी वाहनांवर कारवाई केली जात नाही. मोटारसायकल उचलणे सहज शक्य असते. मोटारसायकलस्वार फारसे हुज्जतही घालत नाहीत. एक गाडी उचलली की टोर्इंगचे १०० रुपये व नो पार्किंगचे २०० रुपये शुल्क आकारले जाते. नियमाप्रमाणे हे शुल्क तुर्भे वाहतूक चौकीमध्ये जाऊन भरणे आवश्यक आहे; परंतु प्रत्यक्षात बहुतांश मोटारसायकल चालकांकडून अधिकृत दंड वसूल केला जात नाही. चौकीच्या बाहेर टोर्इंग व्हॅनचा एक कर्मचारी उभा असतो. तो गाडीचा दंड भरण्यासाठी आलेल्यांना या व्यक्तीची भेट घ्यावी लागते. तीच व्यक्ती लायसन्स व इतर कागदपत्रांची मागणी चालकाकडे करते व जादा दंडाची भीती दाखवून विनापावती ३०० रुपये घेऊन गाडी सोडून देत आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांच्या संगनमताने सुरू असलेल्या या बेकायदेशीर वसुलीकडे वरिष्ठही दुर्लक्ष करू लागले आहेत. >अधिकार दिले कोणी? तुर्भे वाहतूक चौकीबाहेर टोर्इंगवरील कर्मचारी मोटारसायकल चालकाकडे लायसन्स व गाडीचे पेपर तपासण्यासाठी मागत आहेत. पेपर तपासल्यानंतर त्यामधून काही त्रुटी काढून एक हजार ते दोन हजार दंड भरावा लागेल, अशी भीती दाखवतात व नंतर ३०० रुपये विनापावतीचे घेऊन गाडी सोडून दिली जाते. उलट बघा तुमचा फायदा केला, रीतसर दंड भरावा लागला असता तर विनाकारण भुर्दंड बसला असता, अशी वाक्येही ऐकवली जातात. टोर्इंगचा मालक, मॅनेजर किंवा कर्मचारी याला कागदपत्र स्वीकारण्याचा व दंडवसुलीचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. >चार वर्षे एकच पोलीस तुर्भे वाहतूक चौकीमधील अनिल जाधव हे कर्मचारी तीन ते चार वर्षे टोर्इंग व्हॅनवर कार्यरत आहेत. जाधव यांचे व्यक्तिमत्त्व व बोलणे कुस्तीपटूप्रमाणे आहे. अनेक चालकांनी त्यांच्या वर्तणुकीविषयी व वागणुकीविषयी नाराजी व्यक्त केली आहे; पण वरिष्ठांची मर्जी असल्याने व कारवाई करण्यात हातखंडा असल्याने त्यांना दुसरी जबाबदारी दिली जात नाही. >१३०० वरून ३०० रुपये वाहतूक पोलिसांनी मंगळवारी काही वाहनांवर कारवाई केली. यामधील एका महिलेने चौकीबाहेर येऊन बाहेरील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. महिला रडू लागल्याने तिच्यासोबत आलेली लहान मुलगीही रडू लागली. यानंतर टोर्इंग व्हॅनच्या कर्मचाऱ्याने गाडी सोडून दिली. दुसरी गाडी जिथे पकडली तिथे एका कर्मचाऱ्याने ३०० रुपये सांगितले. दुसऱ्याने दोनशे रुपये भरा, असे सांगितले व अखेर १५० रुपयांवर गाडी सोडण्याची तयारी दर्शविली; पण चालकाने चौकीत दंड भरतो, असे सांगितल्यावर तेथे टोर्इंगच्या कर्मचाऱ्याने कागदपत्र तपासून विम्याची मुदत संपल्याने १ हजार व नो पार्किंगचे ३०० असे १३०० रुपये भरण्यास सांगितले व अखेर पावती न देता ३०० रुपये घेऊन गाडी सोडून दिली. हा सर्व प्रकार कोणत्या कायद्यात बसतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. >सर्व नियम धाब्यावर दुचाकी उचलण्यापूर्वी व कारला टोर्इंग लावण्यापूर्वी लाउडस्पीकरवरून आवाज देणे आवश्यक असते. टोर्इंग व्हॅनवर ठेकेदाराचे नाव, कर्मचाऱ्यांची नावे, पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असणे आवश्यक आहे.चौकीच्या बाहेर कोणत्या नियमांच्या उल्लंघनासाठी किती दंड आकारला जातो याचा तक्ता असणे आवश्यक आहे; पण पोलिसांनी यापैकी कोणताच नियम पाळलेला नाही. याविषयी माहिती घेण्यासाठी वाहतूक विभागाचे उपआयुक्त नितीन पवार यांच्याशी संपर्क साधला; परंतु त्यांनी फोन उचलला नसल्याने प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही.
दंडवसुलीसाठी पोलिसांकडून एजंटची नेमणूक
By admin | Updated: March 2, 2017 02:40 IST