अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी गेल्या सप्टेंबरपासून साखरेचा पुरवठा झाला नाही. शासन आदेशानुसार जिल्हय़ासाठी २ हजार ७८६ क्विंटल साखरेचा पुरवठा जुलै महिन्यात होणार आहे. त्यामुळे तब्बल दहा महिन्यांनंतर जिल्ह्यातील गरिबांना स्वस्त भावाची साखर लवकरच मिळणार आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अकोला जिल्ह्यातील दारिद्रय़रेषेखालील (बीपीएल) आणि अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींसाठी दरमहा २ हजार ७८६ क्विंटल साखर पुरवठय़ाची मागणी जिल्हा पुरवठा विभागामार्फत शासनाच्या पुरवठा विभागाकडे केली जाते; परंतु सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत साखरेचा पुरवठा करणार्या साखर कारखान्यांनी गेल्या सप्टेंबरपासून लेव्ही साखरेचा पुरवठा करणे बंद केले. पुरवठा बंद झाल्याने गेल्या दहा महिन्यांपासून जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानांमधून मिळणार्या स्वस्त दरातील साखरेच्या लाभापासून वंचित राहावे लागले. शासनाच्या पुरवठा विभागामार्फत शनिवारी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या आदेशानुसार, अखेर जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांसाठी जुलै महिन्याकरिता २ हजार ७८६ क्विंटल साखरेचा पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्हय़ासाठी साखरेचा पुरवठा करण्यासाठी शासनाकडून वाराणसी येथील बेटा इडिबल्स प्रोसेसिंग प्रा.लि. या संस्थेला पुरवठादार म्हणून नेमण्यात आले आहे. या संस्थेकडून ३ हजार २0७ रुपये प्रतिक्विंटल दराने लवकरच जिल्ह्यासाठी साखरेचा पुरवठा करण्यात येणार आहे. दहा महिन्यांनंतर गरीब लाभार्थींना स्वस्त दराच्या साखरेचा लाभ मिळणार आहे.
दहा महिन्यांनंतर गरिबांना मिळणार स्वस्त साखर
By admin | Updated: July 21, 2014 00:43 IST