ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - सरकार, व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्यानंतरही गुरुवारी सकाळी अाडत कमिशनवरुन वाद झाल्याने नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत व्यवहार ठप्प झाले होते. बाजारपेठेत ४०० पेक्षा जास्त ट्रक भरुन आलेला भाजीपाल्याचा माल पडून होता.
शेतक-याकडून अडत न घेण्याचा निर्णय झाल्यानंतरही नवी मुंबईतील व्यापारी, दलालांनी शेतक-याकडून अाडत वसुलीचा प्रयत्न केला. किरकोळ व्यापा-यांनी आठ टक्के अाडत भरण्यास नकार दिला. त्यामुळे अडत कोण भरणार यावरुन झालेल्या वादातून सकाळी व्यवहार ठप्प झाले होते. अखेर दलालांनी माघार घेत कोणाकडूनही आज अडत वसुली न करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर बाजारपेठेतील माल उचलला गेला.
फळे व भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातही नियमनमुक्त करण्यास शासनाने मान्यता दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी बंद मागे घेण्याची घोषणा केली होती. त्यामुळे उद्यापासून अडत बाजार सुरू होणार असून फळ-भाज्यांची आवक वाढून किरकोळ विक्रीचे भाव खाली येतील असे सरकारचा अंदाज आहे. मागच्या दोन दिवसांपासून बाजार समित्यांच्या बंदमुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.