नाशिक : राज्यातील दुष्काळ आणि टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न आणि समस्यांसंदर्भात कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. आराखड्यानुसार सरकारने त्वरित कार्यवाही न केल्यास मनसेतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येईल.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी व ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची येथे बैठक झाली. त्यात ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या व प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शेतमालाला हमी भाव दिला पाहिजे, पश्चिम वाहिनी नद्या पूर्व वाहिनी नद्यांना जोडाव्यात, स्वामीनाथन आयोगानुसार उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्केनफा देण्यात यावा, शेतजमिनीचे बाजार भावानुसार मूल्यांकन होऊन त्यानुसार कर्ज मिळावे, दुष्काळ निवारण्यासाठी सरकारने समिती नेमावी आदी प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याची उत्तरे शोधू व त्यानंतरच जनआंदोलन उभारू, अशी ग्वाही राज यांनी दिली. महापालिकेतील मनसेच्या नगरसेवकांचीही राज यांनी बैठक घेतली. वॉर्डातील मोकळ्या मैदानांची सविस्तर माहिती २ आॅक्टोबरपर्यंत नगरसेवकांना सादर करायची आहे. (प्रतिनिधी)
दुष्काळावर कृती आराखड्याचा ‘उतारा’
By admin | Updated: September 27, 2015 05:31 IST