मुंबई : इस्टेट एजंटला खोट्या प्रकरणात गुंतवून ५० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी खार पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेंद्र नाथा नेर्लेकर आज गजाआड झाला. मात्र या गुन्ह्यातील मुख्य आरोपी एपीआय सुभाष सामंत अद्यापही फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. आरोपी नेर्लेकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वरळी येथील मुख्यालयात स्वत:हून हजर झाला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. विशेष न्यायालयाने त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारदार इस्टेट एजंटकडून नेर्लेकर यांनी दोन लाखांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर मात्र नेर्लेकर यांनी तक्रारदाराचे फोन उचलले नाहीत. त्यांच्याऐवजी एपीआय सामंत याने २ लाखांऐवजी ५० लाखांची मागणी केली, अशी माहिती एसीबीने सुरुवातीला दिली होती.४ आॅगस्ट रोजी एसीबीने एपीआय सामंत याच्या वांद्रे, कार्टर रोडवरील निवासस्थानी सापळा रचला होता. प्रकरणातील तक्रारदाराला सामंतने १० लाखांचा पहिला हप्ता घेऊन बोलावले होते. पैसे स्वीकारल्यानंतर एसीबी अधिकारी सामंतला पकडणार इतक्यात त्याने पहिल्या माळ्यावरील आपल्या घराच्या खिडकीतून खाली उडी मारली आणि पसार झाला. या घटनेला आठवडा लोटला तरी अद्याप सामंतचा शोध लागलेला नाही.तसेच या प्रकरणात बिल्डर विक्की अरोरा, त्याचे अन्य दोन साथीदार महेश कांबळे आणि रॉबीन गोन्साल्वीस यांच्याविरोधातही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांचाही शोध सुरू असल्याचे एसीबीने सांगितले. हे चारही आरोपी लवकरात लवकर शरण न आल्यास किंवा अटक टाळण्यासाठी लपू लागल्यास त्यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा विचार एसीबी करते आहे. त्यासाठी या चौघांविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करावे, या मागणीसाठी एसीबी न्यायालयात अर्जही करणार असल्याचे समजते. यानंतरही हे चौघे सापडले नाहीत तर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी होऊ शकते. त्यापुढे त्यांची मालमत्ता जप्त होऊ शकते. (प्रतिनिधी)
फरार पोलीस निरीक्षक गजाआड
By admin | Updated: August 12, 2014 02:51 IST