कसबा बावडा : वेतनवाढ २५ टक्के मिळावी, पाच दिवसांचा आठवडा करावा, नोकरभरती करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आज, बुधवारी राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी संपावर गेल्याने जिल्ह्यातील आर्थिक व्यवहार थंडावले. दरम्यान, सकाळी ११ वाजता शहरातील विविध बँकांच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन बँक आॅफ इंडियाच्या लक्ष्मीपुरी शाखेसमोर सरकारच्या विरोधात घोषणा देऊन जोरदार निदर्शने केली. संपामुळे जिल्ह्यात सुमारे ७५० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला.इंडियन बँक असोसिएशन (आयबीए) आणि संलग्न पाच कामगार संघटनांच्यावतीने विविध मागण्यांसाठी संपाची हाक दिली होती. त्यास कर्मचाऱ्यांनी पाठिंबा देऊन संप यशस्वी केला. संपात देशभरातील सुमारे दहा लाखांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे आज आर्थिक व्यवहारावर परिणाम झाला. बँकेत होणारी दररोजची कोट्यवधीची आर्थिक देवाण-घेवाण, तसेच अन्य प्रशासकीय कामकाज थंडावले होते. शहरातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी आपआपल्या बँकांसमोरही निदर्शने केली. दसरा चौकात स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. बँक आॅफ इंडिया कर्मचारी संघटनेचे अशोक चौगले, राजाराम परीट, मोहन चोडणकर, दिलीप पाडळे, तसेच विकास देसाई, संजय उलपे, गजानन भरारे, मकरंद करंदीकर, विलास किर्लोस्कर, विजय भोसले, स्टेट बँकेचे मिलिंद इनामदार, उदय बेनाडीकर, रवींद्र गरुड, आनंदराव पाटील, सुरेश चिंदरकर, संभाजी वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. (प्रतिनिधी)इचलकरंजीत साठ कोटींचे समाशोधन ठप्पइचलकरंजी : बॅँकांमधील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहरातील १९ राष्ट्रीयकृत व खासगी बॅँकांचे कामकाज ठप्प झाले. येथील आर्थिक उलाढालीवर परिणाम होऊन सुमारे ६० कोटी रुपयांच्या धनादेशांचे समाशोधन ठप्प झाले.दीड अब्जावर पाणीराष्ट्रीयीकृत बॅँक कर्मचारी आज, बुधवारी एक दिवसाच्या संपावर गेल्याने त्यांना एक दिवसाच्या पगारावर आता पाणी ओतावे लागणार आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या पगाराची रक्कम एक अब्ज ५० कोटींच्या घरात जाते. ही सर्व रक्कम याच महिन्याच्या २८ तारखेला होणाऱ्या पगारातून कापली जाणार आहे.चार दिवस संपबँक कर्मचारी आपल्या याच मागण्यांसाठी २ ते ५ डिसेंबर दरम्यान सलग चार दिवस विभागवार संप करणार आहेत. २ डिसेंबरला संपूर्ण दक्षिण भारतात, ३ डिसेंबरला उत्तर भारतात, ४ डिसेंबरला पूर्व भारतात, तर ५ डिसेंबरला पश्चिम भारतात संप करण्यात येणार आहे.
७५० कोटींची उलाढाल ठप्प !
By admin | Updated: November 13, 2014 00:01 IST