मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येकाची आठवण म्हणूनच कुलाबा येथील नरिमन हाऊस म्हणजेच छाबड हाऊस येथे संग्रहालय उभारण्यात आले आहे. हे संग्रहालय फक्त ज्यूसाठी नाही तर सर्व धर्मियांसाठी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.सहा वर्षानंतर छाबड हाऊस मंगळवारी पुन्हा एकदा गजबजले. कुलाबा येथील छाबड हाऊस हे ज्यूंचे धार्मिक स्थळ आहे. रब्बी गॅब्रिएल आणि त्यांची पत्नी रिविका हे येथे राहात होते. झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये या दोघांचाही मृत्यू झाला होता. त्यांच्याबरोबर आणखी चार जणांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यांचा २ वर्षाचा मुलगा मोशे हल्ल्यात बचावला होता. त्याला आजी आजोबा इस्त्रायलला घेऊन गेले. मोशे आता सात वर्षांचा आहे, त्याचेही फोटो येथे लावण्यात आले आहेत. ज्यू धर्मियांनी पैसे जमा करून या इमारतीची पुर्नबांधणी केली आहे. या वास्तूमध्ये त्यांच्या आठवणी आहेत, त्या ज्यू धर्मियांनी जतन केल्या आहेत. म्हणूनच या वास्तूचे त्यांनी संग्रहालयात परिवर्तन केले आहे. छाबड हाऊस ही सहा मजली इमारत जुन्या खुणांच्या बरोबरीने नव्या रुपात आता तयार करण्यात आली आहे. या इमारतीचा तळमजला हा रिकामाच ठेवण्यात आला आहे. पहिल्या मजल्यावर स्वयंपाकघर दुसऱ्या मजल्यावर ज्यूंचे प्रार्थनास्थळ सिनेगॉग आहे. तिसऱ्या मजल्यावर हॉल असून चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर आठवणींचे जतन (संग्रहालय) करण्यात आलेले आहे. सहाव्या मजल्यावर दोन खोल्या आहेत, एका बाजूला गच्ची आहे, त्याच्यावर अजून एक गच्ची आहे. या गच्चीवरच एनएसजी कमांडो दहशतवादी हल्ल्याच्या वेळी उतरले होते. चौथा संपूर्ण मजला तसाच्या तसाच ठेवण्यात आला आहे. त्या मजल्यावर अजूनही गोळ््यांच्या खुणा आहेत. मात्र मोशे ची खोली तशीच ठेवली आहे. (प्रतिनिधी)
छाबड हाऊसमध्ये २६/११ शहिदांचे संग्रहालय
By admin | Updated: August 28, 2014 03:12 IST