हायवेवर थरार : कर्मचार्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून केले वारपुणे : भारत पेट्रोलियम कंपनी संचालित पेट्रोल पंपावर जमा झालेली दोन दिवसांची २० लाख ५७ हजारांची रोकड बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना लुटण्यात आली. ही रक्कम घेऊन जात असलेल्या कर्मचार्याच्या डोळ्यांमध्ये मिरचीची पूड टाकून धारदार हत्यारांनी वार करण्यात आले. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास केवळडे फाट्याच्या पुढे ही घटना घडली.मौला शेख (वय २८, रा. केळवडे, ता. भोर) असे जखमी कर्मचार्याचे नाव आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख हे मूळचे उस्मानाबाद जिल्ातील रहिवासी असून काही वर्षांपासून ते केळवडे येथे राहत आहेत. भारत पेट्रोलियमच्या केळवडे फाट्यावरील पेट्रोल पंपावर ते नोकरी करतात. पेट्रोल पंपावर जमा झालेली दररोजची रक्कम बँकेत भरण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस पेट्रोलपंपावर जमा झालेली २० लाख ५७ हजारांची रोकड घेऊन शेख कात्रज येथील स्टेट बँकेच्या शाखेत निघाले होते. खेड शिवापूर येथील कंपनीच्या आणखी एका पंपावरील रक्कम त्यांना घ्यावयाची होती. खेड शिवापूरच्या दिशेने मोटारसायकलवरून जात असतानाच मोटारसायकलवरून अचानक दोघेजण आले. त्यांनी शेख यांना धडक देऊन खाली पाडले. उठण्याचा प्रयत्न करीत असतानाच काही कळायच्या आतच त्यांनी शेख यांच्या डोळ्यांमध्ये मिरचीची पूड टाकली. कोयत्यासारख्या धारदार हत्यारांनी त्यांच्या हातावर, खांद्यावर आणि शरिरावर वार करायला सुरुवात केली. गंभीर जखमी झालेल्या शेख यांच्या खांद्याला असलेली पैशांची बॅग घेऊन चोरटे पुण्याच्या दिशेने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, अतिरिक्त अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपअधीक्षक मिलींद मोहिते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी देवकर, सहायक निरीक्षक संदीप घोरपडे, होडघर यांनी भेट दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामीण भागात आणि महामार्गावर नाकाबंदी केली. तसेच सातारा आणि पुणे शहर पोलिसांनाही नाकाबंदीच्या सूचना दिल्या. पोलिसांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून त्यावरून तपास सुरू करण्यात आला आहे. पुणे शहरालगतच्या सर्वच रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली असून सर्वत्र गस्त वाढविण्यात आल्याची माहिती देवकर यांनी दिली.