सीआरपीएफची कारवाई : मेटे जांगडाजवळील घटना देसाईगंज (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तहसील अंतर्गत मेटेजांगडा जंगल परिसरात सोमवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वेगवेगळय़ा बटालियनच्या जवानांनी स्थानिक पोलीस दलाच्या मदतीने जंगलात पेरलेली १५ किलो स्फोटके व अन्य साहित्य जप्त केले. धानोरा तालुक्यातील मेटेजांगडा जंगल परिसरात २६ मे रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाची २0६ कोब्रा, ११३, १९१ बटालियन स्थानिक पोलीस दलाच्या मदतीने शोधमोहीम राबवीत होती. यावेळी जमिनीत पेरलेली १५ किलो फोटके व अन्य साधनसामग्री सुरक्षा दलाने शोधून काढली. या परिसरात नक्षलवाद्यांनी स्फोटके गाडून ठेवली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलांनी या भागात शोधमोहीम आखली होती. या अभियानाचे नेतृत्व १९१ बटालियनचे उपकमांडंट करतार सिंह यांनी केले. स्फोटकासह अतिरिक्त इलेक्ट्रिकल तार, डेटोनेटर, बॅटरी, औषध आदी सामग्री जप्त करण्यात आली. अलीकडेच चामोर्शी तालुक्याच्या मुरमुरीजवळ नक्षलवाद्यांनी स्फोटकांच्या साहाय्याने भूसुरूंग स्फोट घडवून आणला होता. यात महाराष्ट्र पोलीस दलाचे सात जवान शहीद झाले होते. अशा स्थितीत सीआरपीएफने केलेली कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे, अशी माहिती १९१ बटालियनचे कमांडंट सुरेश एस. व्दितीय कमान अधिकारी मोहनदास खोब्रागडे, उपकमांडंट अमरविर सिंह, उपकमांडंट करतार सिंह, उपकमांडंट बालाराम, सहायक कमांडंट ए. के. सिंह यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)
१५ किलो स्फोटके जप्त
By admin | Updated: May 28, 2014 00:54 IST