लातूर : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी मास्कचे महत्व वाढले आहे. अनेकजण एकावर एक असे दोन मास्क वापरताना दिसत आहेत. अशा प्रकारे डबल मास्क वापरण्यात कोणताही तोटा नाही, फायदाच आहे. मास्क कुठलाही वापरा, फक्त तो योग्य पद्धतीने वापरला पाहिजे. शिवाय आयसीयु बेड, रेमडेसिविर इंजेक्शन शोधण्याची वेळ ओढवण्यापेक्षा मास्कवर भर दिला तर रुग्णालयात जाण्यापासून टाळता येणे शक्य असल्याचे लातूर शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडता येत आहे. मास्क लावूनच घराबाहेर जाण्यास प्राधान्य दिले जात आहे. आधी सर्जिकल मास्क आणि त्यावर एन-९५ अथवा आधी कापडी मास्क, त्यावर रुमाल अशाप्रकारे एकावर एक दोन मास्क वापरण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. मास्क वापरला जात आहे, परंतु मास्क वापरताना पुरेशी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे मास्क लावलेला असतानाही कोरोनाची लागण कशी झाली, असा सवाल रुग्णांकडून उपस्थित केला जातो. त्यामुळे मास्क कितीही अधिक रकमेचा असला तरी तो योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
मास्क कसा वापरावा...
रुग्णालयात भरती होऊन खर्च करण्यापेक्षा चांगल्या पद्धतीच्या मास्कसाठी खर्च केला पाहिजे. मास्क वापरताना तो नाक आणि तोंड झाकले जाईल, अशा पद्धतीचा हवा. हनुवटीखालून, नाकाच्या भागातून अथवा गालाच्या बाजूने हवा आतमध्ये येता कामा नये. यासाठी मास्क पुरेसा घट्ट बांधला गेला पाहिजे. कापडी मास्क अथवा वापरता तो मास्क स्वच्छ धुतलेला असावा.
मास्क वापरताना हे करू नका...
एकच मास्क न धुता अनेक दिवस वारंवार वापरु नये. बाहेरून घरी आल्यानंतर अनेक जण मास्कची घडी घालून खिशात ठेवतात आणि बाहेर पडताना पुन्हा तोच मास्क वापरतात. असे करू नये.
घरी आल्यानंतर मास्क टाकून द्यावा किंवा धुण्यासाठी टाकावा. मास्क हनुवटीखाली, मानेखाली आणून परत लावणे टाळावे. मास्कचा बाहेरील अथवा आतील भागाला स्पर्श टाळावा.
घराबाहेर विनाकारण पडू नये. खूपच आवश्यक काम असेल तर विनामास्क बाहेर पडणे टाळावे. घरापासून जवळ जात असलात तरी मास्क अवश्य वापरावा. चांगल्या दर्जाचा आणि स्वच्छ मास्क वापरण्यास प्राधान्य देण्याचा आग्रह धरावा.
एक मास्क वारंवार वापरू नये...
एन-९५ मास्कद्वारे सरंक्षण होते. तसेच आधी कॉटन आणि त्यावर एन-९५ मास्क वापरल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी आहे. एकच मास्क वारंवार वापरू नये. कॉटनचा मास्क रोज गरम पाण्यात धुवून कडक उन्हात वाळत घालावा. जोही मास्क वापरता तो योग्य पद्धतीने वापरायला हवा. - डॉ. सुरेखा काळे, अध्यक्षा, आयएमए