जळकोट : तालुक्यातील तीन तांड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची विद्युत डीपी जळाल्याने तांड्यातील नागरिकांवर जलसंकट आले आहे. परिणामी, तेथील नागरिकांना ४- ५ किमीपर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पायांना चटके सोसत नागरिक घागरभर पाण्यासाठी वणवण फिरत असल्याचे दिसून येत आहे.
जळकोट तालुक्यात वाडी- तांड्यांची संख्या अधिक आहे. तालुक्यातील थावरू तांडा, मेघा तांडा आणि रावजी तांडा या तीन तांड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी याेजनांची विद्युत डीपी जळाली आहे. परिणामी, तेथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. थावरू तांड्याची लोकसंख्या २००, मेघा तांड्याची २००, तर रावजी तांड्याची लोकसंख्या ४०० च्या जवळपास आहे. या तिन्ही तांड्यांवर जवळपास ४ ते ५ हजार पशुधनाची संख्या आहे. मात्र, गेल्या २० दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने तेथील नागरिकांना पिण्यासाठी व पशुधनासाठी फिरावे लागत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचे हाल होत आहेत.
विशेष म्हणजे, या तांड्यांवरील नागरिक स्नानासाठी दोन किमी अंतरावर असलेल्या नदीवर जात आहेत. महिलांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. या तांड्यांना वीजपुरवठा करणाऱ्या दोन्ही विद्युत डीपी बंद पडल्या आहेत. १५ दिवस उलटले तरी नवीन डीपी बसविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे तेथील नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने अर्ज, विनंत्या केल्या. परंतु, आश्वासनांशिवाय काहीच पदरात पडत नाही. विशेष म्हणजे, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी बैठकीस महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना करूनही अद्यापही नवीन डीपी बसविण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
घागरभर पाणी मिळेना...
तांड्यास पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत डीपी जळाल्या आहेत. त्या दुरुस्त करण्यात याव्यात, अशी वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे मागणी केली. मात्र, अद्यापही दुर्लक्ष होत आहे. घागरभर पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे तत्काळ नवीन डीपी बसविण्यात यावी, अशी मागणी सरपंच शिरीष चव्हाण यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
डीपी नसल्याने समस्या...
नवीन डीपी बसविण्यासाठी अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. ती मिळाल्यानंतर तत्काळ बसविण्यात येईल. गावातील इतर किरकोळ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. डीपी कमी असल्यामुळे विलंब होत आहे. डीपीसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे, असे नळगीर येथील साहाय्यक अभियंता तरटे यांनी सांगितले.