लातूर : जिल्ह्यात सौम्य लक्षणांच्या रुग्णांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केले जातात. काढा, नाश्ता, फळे, सकाळ आणि दुपारच्या भोजनाची सोय प्रशासनाच्या वतीने केली जाते. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना रुग्णांना भोजन पुरविणाऱ्या पुरवठादारांचेच बिल थकले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना भोजन देणारेच उपाशी असल्याचे चित्र आहे.
लातूर जिल्ह्यात जवळपास २४ कोविड केअर सेंटर कार्यान्वित असून, यामध्ये १ हजार ४४८ रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना भोजन पुरविण्याची जबाबदारी शहरातील खासगी पुरवठादारांकडे देण्यात आली आहे. त्यांच्या वतीने प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच कोरोना रुग्णांना सेवा पुरविली जाते. मात्र या पुरविलेल्या सेवेची बिले तत्काळ मिळत नसल्याचे चित्र आहे. गत वर्षभरात केवळ तीनच बिले निघाली आहेत. दर पंधरा दिवसांनी प्रशासनाकडे बिले सादर केली जातात. मात्र त्यावर लवकर निर्णय होत नसल्याने पुरवठादारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पुरवठादारांना बिल मिळालेले नाही.
काय दिले जाते जेवणात
कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना सकाळी ८ वाजता काढा आणि नाश्ता दिला जातो. दुपारी १२ ते १ या वेळेत भोजन दिले जाते. तसेच ४ ते ४.३० या वेळेत काढा आणि संत्री, डाळिंब दिले जातात.
रात्री ८ वाजेदरम्यान रुग्णांना भोजन दिले जाते. कोविड केअर सेंटरच्या वतीने रुग्णांसाठी आहाराबाबत नियमावली ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित पुरवठादाराच्या वतीने सेवा पुरविली जाते. वेळेत सेवा देण्यावर अधिक भर आहे.
नाश्त्यासाठी उपमा, उसळ
नाश्त्यासाठी कोविड केअर सेंटरच्या वतीने पदार्थ ठरवून देण्यात आले आहेत. त्यानुसार उपमा, उसळ तसेच यामध्ये खारीक, बदाम दिले जातात. नियमितपणे ४ ते ४.३० वाजेच्या दरम्यान काढा आणि फळे दिली जातात. यामध्ये संत्री आणि डाळिंबाचा समावेश आहे.
कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेऊन नुकताच घरी आलो आहे. दहा दिवस उपचारादरम्यान चांगल्या प्रकारचे जेवण पुरविण्यात आले. घरगुतीप्रमाणे भोजन होते. त्यासोबतच आयुर्वेदिक काढाही दर्जेदार होता. दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा भोजनात समावेश आहे. एकंदरीत, कोविड केअर सेंटरमध्ये मिळणारे भोजन दर्जेदार आहे.
- सुधाकर, बरे झालेले रुग्ण
सकाळी वेळेवर मिळणारा नाश्ता, दुपारचे भोजन, काढा, फळे आजार काळात उपयुक्त आहेत. भोजनासह नाश्ताही वेळेवर दिला जातो. भोजनात दररोज वेगवेगळी भाजी असल्याने घरचे भोजन करीत असल्याचा अनुभव येतो. आजारपणाच्या काळात चांगला आहारच माणसाला सुदृढ करीत असतो. कोविड सेंटरमध्ये चांगल्या प्रकारचे भोजन मिळाले.
- गौतम, बरे झालेले रुग्ण
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. गेल्या दीड वर्षांपासून कोरोना रुग्णांना भोजन पुरविण्याची जबाबदारी पार पाडत आहोत. चांगल्या प्रकारची सेवा देण्यावर भर आहे. मात्र पुरविलेल्या सेवेची बिले वेळेत सादर करूनही लवकर मंजूर होत नाहीत. मागील वर्षात केवळ तीन बिले पास झाली आहेत. शेवटचे बिल ऑक्टोबर महिन्यात मिळाले. बिल सादर केल्यानंतर लवकर मंजुरीची अपेक्षा आहे.
- संदीपकुमार जाधव, पुरवठादार