जळकोट : तालुक्यात ५५ हजार पशुधनाची संख्या असून पशुधनाच्या सेवेसाठी केवळ एकच पशुधन विकास अधिकारी कार्यरत आहे; तर श्रेणी दोनचे नवीन पशुवैद्यकीय दवाखान्याचे आठ प्रस्ताव मंजुरीसाठी शासन दरबारी लालफितीत अडकले आहेत. त्यामुळे पशुधनाची गैरसोय टाळण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मंजुरी देण्याची मागणी होत आहे.
जळकोट तालुक्याला नवीन तालुका लघुपशुचिकित्सालयाची मंजुरी देण्यात यावी. सध्या कार्यरत असलेले चार पशुवैद्यकीय दवाखान्यांपैकी दोनच ठिकाणी डॉक्टर आहेत. दोन ठिकाणची पदे रिक्त असल्याने पशुधनाचे आरोग्य सांभाळणे पशुपालकांना जिकिरीचे ठरत आहे. पशुधनाची जोपासना करण्यासाठी नवीन आठ दवाखान्यांना मंजुरी द्यावी, रिक्त पदे तत्काळ भरावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते संतोष तिडके यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंगरूळ, उमरगा, रेतू, रावणकोळा, माळहिप्परगा, गुत्ती, जगळपूर, तिरुका, सोनवळा या आठ गावांत श्रेणी दोनचे नवीन पशुवैद्यकीय दवाखाने स्थापन करण्यात यावेत, असा प्रस्ताव जळकोटच्या पशुधन विकास अधिकारी कार्यालयामार्फत गेला आहे. मात्र, अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी मिळाली तर अनेक गावांतील पशुधनाच्या आरोग्याची जोपासना होणार आहे. वांजरवाडा, आतनूर, घोणसी, कुनकी या चार श्रेणी दोनच्या दवाखान्याचे अद्ययावतीकरण करून त्या ठिकाणी श्रेणी १ चे दवाखाने मंजूर करण्यात यावेत; तसेच मनुष्यबळ वाढवावे, अशी मागणी होत आहे.
नवीन दवाखान्याचा प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा
शासनाकडून डॉक्टरांचे पदे मंजूर झाल्यानंतर पशुपालकांची व पशूंची गैरसोय होणार नाही. नवीन प्रस्तावित दवाखान्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच डॉक्टरांची उपलब्धता होईल, असे जळकोटच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. सुरेखा नामोड यांनी सांगितले.
पशुवैद्यकीय दवाखान्याच्या मंजुरीसाठी पाठपुरावा
याबाबत राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री, पालकमंत्री अमित देशमुख, पशुसंवर्धन विभागाचे उपसचिव यांना भेटून शासनाच्या धोरणाप्रमाणे नवीन आठ प्रस्तावित दवाखान्यांना मंजुरी मिळविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. दोन श्रेणींचे चार दवाखाने श्रेणी एकमध्ये वर्ग करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
डॉक्टरांची रिक्त पदे भरावीत...
डॉक्टरांची रिक्त पदे भरावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते संतोष तिडके यांच्यासह शिरीष चव्हाण, सत्यवान पांडे, गोविंद केंद्रे, श्रीराम ढोबळे, अविनाश नळदवार, बाबूराव कुठे, रमेश पारे, बाबुमियॉ लाटवाले, सूर्यकांत धूळशेटे, शिवराज तोंडे, नगरसेवक शिवानंद देशमुख, उमाकांत देशमुख, श्रावण गायकवाड, आयुब शेख यांनी केली आहे.