येरोळ : येरोळ व परिसरात वन्यप्राण्यांनी धुडगूस घातला आहे. रबी हंगामातील बहरत असलेली पिके वन्यप्राणी फस्त करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, पिकांचे संरक्षण करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी जुन्या साड्यांचा वापर सुरू केला आहे.
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ व परिसरातील जलसाठे भरल्याने यंदा रबी हंगामाचा पेरा वाढला आहे. रबीतील हरभरा, गहू, ज्वारी आदी पिके बहरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. दरम्यान, बहरत असलेल्या पिकांवर वन्यप्राणी ताव मारत आहेत. हिरवीगार पिके वन्यप्राणी फस्त करीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त होत आहेत. रानडुकरांनी काही शेतकऱ्यांचे ज्वारीचे पीक मोडून टाकल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वनप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
***