लातूर : कोरोनाचे साखळदंड तोडून एस.टी. दौडत असून, प्रवाशांचाही प्रतिसाद आता वाढू लागला आहे. राज्यासह परराज्यांतही एस.टी.ची सेवा सुरू झाली असून, रोज ती एक लाख ३० हजार किलोमीटर धावत आहे. रोज ७० हजार प्रवाशांची एस.टी.तून चढ-उतार होत आहे. दिवसाला लातूर विभागाला सरासरी ३० लाखांचे उत्पन्न मिळत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे एस.टी.ची सेवा बंद होती. निर्बंध शिथिल झाल्यानंतर जिल्हाअंतर्गत बससेवा सुरू झाली. त्यानंतर जिल्ह्याबाहेर आणि आता परराज्यांतही एस.टी.ने सेवा सुरू केली आहे. मात्र शाळा बंद असल्याने ग्रामीण भागातील शंभर ते दीडशे फेऱ्या बंद आहेत.
दिवसाला १५ लाखांचा तोटा
कोरोनापूर्वी एस.टी. एक लाख ६० हजार किलोमीटर धावत होती. सध्या एक लाख ३० हजार किलोमीटर धावत आहे. कोरोनापूर्वी महामंडळाला दिवसाला ४५ लाख रुपये उत्पन्न मिळत होते. तर आता ३० लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. एस.टी.ला अद्यापही सरासरी १५ लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे.
हैदराबाद मार्गावर प्रतिसाद
जिल्ह्यातील पाचही आगारांतून परराज्यांमध्ये एकूण ३० बसेस सुरू आहेत. हैदराबाद, गुलबर्गा, निजामाबाद, बसवकल्याण, औराद बाऱ्हाळी, बिदर, भालकी, विजापूर, आदी परराज्यांतील गावांना लातुरातून बस जाते. यांपैकी हैदराबाद मार्गावर प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद आहे. गुलबर्गा, निजामाबाद, बसवकल्याण, बाऱ्हाळी गावांनाही प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे.
जिल्हाअंतर्गत फेऱ्या बंद
शाळा-महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी पासेस असणाऱ्या फेऱ्या बंद आहेत. उर्वरित ९० टक्के गाड्या सुरू झालेल्या आहेत. सर्व मार्गांवरून प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. कोरोनापूर्वीच्या तुलनेत हा प्रतिसाद कमी असला तरी चांगला आहे, असे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी सांगितले.
पुणे-मुंबईला गर्दी
पुणे व मुंबई शहरांत जाण्यासाठी रेल्वे आणि खासगी बसेस सुरू झाल्या असल्या तरी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसलाही प्रतिसाद वाढला आहे. सर्वाधिक गर्दी पुणे शहरासाठी आहे. त्याखालोखाल मुंबईलाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विभाग नियंत्रक क्षीरसागर यांनी सांगितले. औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, सांगली या मार्गांवरही प्रतिसाद वाढत आहे.
एकूण आगारे ५
एकूण बसेस ४९४
सध्या सुरू असलेल्या बसेस ३३०
परराज्यांत धावणाऱ्या बसेस ३०
एकूण फेऱ्या ६५५