शिरूर अनंतपाळ : तालुक्यात प्रायोगिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, काही शेतकऱ्यांनी उसात आंतरपीक म्हणून हरभऱ्याची पेरणी केली आहे. परंतु, वांजरखेडा येथील एका शेतकऱ्याने उसाच्या नऊ फूट सरीमध्ये आंतरपीक म्हणून उन्हाळी सोयाबीन घेतले आहे. उसात सोयाबीन चांगलेच बहरले असल्याने एकरी १२ क्विं.चे उत्पादन पदरी पडेल, अशी अपेक्षा सदरील शेतकऱ्याला आहे.
तालुक्यातील वांजरखेडा येथील तालुका कृषी सल्लागार समितीचे सदस्य विठ्ठलराव पाटील यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नवनिर्मितीचा ध्यास घेतला आहे. दोन एकरांमध्ये नऊ फूट अंतरावर उसाची लागवड केली आहे. उसाच्या दोन सरींमधील अंतर तब्बल नऊ फूट असल्याने विठ्ठलराव पाटील यांनी आंतरपीक म्हणून उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली आहे. सध्या उसातील उन्हाळी सोयाबीन चांगले बहरले असून, त्याला फुले लागत आहेत. त्यामुळे सोयाबीनचे चांगले उत्पादन पदरी पडेल, अशी अपेक्षा आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, पाटील यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होईल, अशा पद्धतीची प्रायोगिक शेती सुरू केली आहे.
क्षेत्र कमी, उत्पादन अधिक...
शेतीमध्ये विविध प्रायोगिक पद्धतींचा वापर विठ्ठलराव पाटील हे करतात. त्यांनी नऊ फूट सरीमध्ये उन्हाळी सोयाबीनची पेरणी करून बहारदार पीक जोपासले आहे. त्यामुळे उन्हाळी सोयाबीनची पाहणी करण्यासाठी अनेक शेतकरी पाटील यांच्या शेतीस भेट देत आहेत. उन्हाळी सोयाबीनचे एकरी १२ क्विंटलचे उत्पादन होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.