लातूर : गेल्या दहा वर्षांत गव्हाला ज्वारीच्या भाकरीने मागे टाकले आहे. गव्हापेक्षा ज्वारीचा भाव तेजीत आहे. परिणामी, शहरी भागात ज्वारीला पर्याय म्हणून गव्हाला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबांसह सामान्यांचा भाकरच आधार ठरली आहे.
उच्च प्रतीची ज्वारी प्रतिक्विंटल २,५०० ते ३,००० रुपये, तर गव्हाला २,२०० ते २,४०० रुपयांचा दर आहे. आरोग्याच्या दृष्टीने ज्वारी अधिक महत्त्वाची आहे. बद्धकोष्ट, मूळव्याध, अपचन, वजन वाढणे, अशा व्याधींपासून सुटका मिळावी, यासाठी डॉक्टरांकडून ज्वारीची भाकर आहारात वापरण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय, रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारीची भाकर अधिक महत्त्वाची भूमिका बजावते. पूर्वी भाकरीला गरिबीची किनार होती. आता ज्वारीने गव्हाला मागे टाकल्याने तिची श्रीमंती वाढली आहे.
भाकरीच परवडायची म्हणून खायचो
एखाद्या कुटुंबात गव्हाच्या पोळ्या या सणावाराला व्हायच्या. गहू महाग होता. त्या तुलनेत ज्वारी स्वस्त होती. म्हणून भाकरच आहारात परवडत होती.
-अंगद मुळे
दहा ते पंधरा वर्षांपूर्वी ज्वारीचा दर आवाक्यात होता. गहू मात्र सामान्यांच्या आवाक्याबाहेर होता. ज्वारी गरिबांची आणि गहू श्रीमंतांचा, अशी प्रतिष्ठा असलेली समज होती.
-साहेबराव निकाळजे
आता चपातीच परवडते
ज्वारी महागल्याने अनेक कुटुंबांच्या आहारातील भाकर गायब झाली आहे. तिची जागा गव्हाच्या पोळ्यांनी घेतली आहे. गहू सध्याला परवडत आहे.
-बालाजी बामणे
ज्वारीची भाकर आवडत असली तरी प्रतिक्विंटलचा भाव वधारला आहे. पर्याय म्हणून गव्हाच्या पोळ्यांना प्राधान्य द्यावे लागत आहे. -बालाजी सुकणीकर
आपल्या आरोग्याची श्रीमंतीही ज्वारीतच
१. ज्यांना अपचनाचा त्रास जाणवतो, त्यांनी आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा. ज्वारीच्या भाकरीमुळे मूळव्याधीचा त्रास कमी होतो.
२. मूतखड्याचा त्रास असलेल्या व्यक्तीने आहारात ज्वारीच्या भाकरीचे सेवन केले, तर फायदा होतो. पोषक तत्त्वांमुळे मूतखड्याचा त्रासही कमी होतो.
३. ज्वारीच्या भाकरीबरोबर त्यापासून बनविलेले इतर खाद्यपदार्थांचाही आहारात समावेश केल्यास ते प्रकृतीसाठी पोषक ठरते. ज्वारीत लोहतत्त्व अधिक असते. ॲनिमियाचा त्रास असलेल्यांनी भाकरीला प्राधान्य द्यावे.
जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन घटले
जिल्ह्यातील तीन लाख हेक्टर रबीच्या क्षेत्रापैकी हल्ली बहुतांश क्षेत्रावर उसाची लागवड आहे. त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र घटले आहे. २५ हजार हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रावर रबी ज्वारीचा पेरा होतो.