उदगीर (जि. लातूर) : मोंढ्यात येणाऱ्या धान्यावर, कापसावर शैक्षणिक कर लावून शेतकरी कष्टकऱ्यांच्या श्रमातून उभ्या राहिलेल्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाची सहा दशकोत्तर वाटचाल हजारो माजी विद्यार्थ्यांच्या आदरस्थानी राहिली आहे. प्रामुख्याने महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. ना.य. डोळे यांच्या स्मृतींना उजाळा देणारे शेकडो विद्यार्थी राज्यात, देशात अन् विदेशातही विविध क्षेत्रांत लौकिक मिळवीत आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची जून १९६२ मध्ये स्थापना झाली होती. संस्थापक अध्यक्ष नथमलशेठ इनानी यांची निवड करून संस्थेअंतर्गत उदयगिरी महाविद्यालय सुरू झाले होते. या महिन्यात जवळपास ६० वर्षांचा कालखंड पूर्ण करणारे हे महाविद्यालय मराठवाड्यातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र राहिले आहे. महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य डॉ. ना.य. डोळे यांचे नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग राज्यभर चर्चिले गेले. १२० विद्यार्थी त्यात १२ विद्यार्थिनींसह सुरू झालेले महाविद्यालय गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचे द्वार होते. सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि दहावीला प्रथम श्रेणी घेेऊन महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा १० रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय डॉ. डोळे आणि संस्थेच्या कार्यकारिणीने घेतला होता. अंगभर कपडे नाहीत, शुल्क भरणे दूरच पुस्तकांसाठीही पैसे नाहीत, अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसरातच रोजगार निर्माण करून विद्यार्थ्यांची अडचण दूर केली. तब्बल २८ वर्षे प्राचार्य राहिलेल्या डॉ. डोळे यांनी शेतकरी, शेतमजूर, दलित, वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनविले होते. ज्यामुळे शिस्त, सेवा आणि त्यागाला प्राधान्य देणारी पिढी या महाविद्यालयातून बाहेर पडली. इनानी यांच्यानंतर विधिज्ञ संग्रामप्पा कप्पीकेरे, सुभाष मुक्कावार, विधिज्ञ मन्मथप्पा नीला, मलशेट्टी पाटील नागराळकर आणि आता बसवराज पाटील नागराळकर हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. डॉ. डोळे यांच्यानंतर डॉ. के. आंध्रदेव, जी.एस. साखरे, डॉ. बी.बी. संकाये, डॉ. एम.व्ही. उमाटाळे, डॉ. के.व्ही.के. मूर्ती, डॉ. व्ही.पी. पवार, डॉ. के.बी. कनकुरे, डॉ. राजकुमार लखादिवे, डॉ. बी.एम. संदीकर आणि आता डॉ. आर.आर. तांबोळी कार्यरत आहेत.
मुलींसाठी वसतिगृह आणि त्यांच्या जाण्या-येण्याची सोय करणारे उदयगिरी महाविद्यालय पहिले होते. शिक्षणातून परिवर्तन आणि त्यातून व्यक्तिगत, सामाजिक आणि देशाचा विकास हे सूत्र उदयगिरी महाविद्यालयाने ठेवले असल्याचे विद्यार्थी सांगतात.