अहमदपूर : शासनाच्या मानधनासाठी निराधारांना दरवर्षी हयात प्रमाणपत्र सादर करावे लागते. तालुक्यात १० हजार निराधार असून हयात प्रमाणपत्रासाठी तालुका अथवा तलाठी सज्जावर निराधारांचे हेलपाटे सुरू आहेत. मात्र, तलाठी भेटत नसल्याने वृध्द निराधारांची ससेहोलपट होत आहे.
तालुक्यात एकूण १० हजार ३९७ निराधार आहेत. त्यात संजय गांधी निराधार योजनेचे २ हजार ७६८, वृद्धापकाळ योजनेचे ७ हजार ६०९ लाभार्थी आहेत. या निराधारांना राज्य, केंद्र सरकारच्या वतीने मासिक ठरावीक मानधन बँक खात्यात जमा केले जाते. त्यासाठी दरवर्षी निराधारांना हयात प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय निवृत्तीवेतन मिळत नाही. दरवर्षी जुलै महिन्यात हयात प्रमाणपत्रासाठी निराधारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते.
सध्या या प्रमाणपत्रासाठी वृद्ध, दिव्यांग महिलांना निराधारांना तलाठी सज्जाजवळ तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे. तसेच गर्दीही होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध लागू केले आहेत. मात्र, गर्दीमुळे नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. येथील तहसील कार्यालयात शेकडो निराधार हयात प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत होते.
हयात प्रमाणपत्रासाठी वेळापत्रक...
तालुक्यात ३५ तलाठी सज्जे असून १२६ गावे आहेत. त्यातील सर्व तलाठ्यांना संबंधित गावात जाण्यासंबंधी सूचना करून त्यांचे वेळापत्रक देण्यात येणार आहे. निराधारांनी तहसील कार्यालयात अथवा तलाठी सज्जात गर्दी करू नये, असे आवाहन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे.
निराधारांना गावातच प्रमाणपत्र...
मागील वर्षी निराधारांना थेट गावातच बँकेच्या वतीने अनुदान मिळण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावर्षी निराधारांनी तालुक्याच्या ठिकाणी अथवा तलाठी सज्जावर न जाता गावातच दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहावे. तिथेच त्यांना हयात प्रमाणपत्र देण्याविषयी तहसीलदारांना सूचना केली असल्याचे आ. बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.