लोकमत न्यूज नेटवर्क
डिगोळ : परतीच्या पावसामुळे यावर्षी रब्बीतील पिके जोमात आली आहेत. हरभरा, भुईमूग पीक बहरल्याने हरणे कोवळी पिके खात आहेत तर रानडुक्कर नासधूस करत आहेत. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी शेतकरी विविध प्रयोग करत आहेत. येथील काही शेतकऱ्यांनी पीक वाचविण्यासाठी शेतीला साडीचे कुंपण घातले आहे.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे विहिरी, नाले तुडुंब भरल्याने या भागात रब्बीचा पेरा वाढला आहे. सध्या रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी, भुईमूग ही पिके बहरत आहेत. अशा परिस्थितीत वन्यजीव पिकांवर ताव मारत आहेत. डिगोळ परिसरातील काही शेतकऱ्यांनी १० ते २० किलो बियाणे खरेदी करुन भुईमुगाची पेरणी केली आहे. काही शेतकऱ्यांचे भुईमूग पातळ प्रमाणात उगवले आहे. अशा परिस्थितीत वन्यजीवांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे पिकांच्या संरक्षणासाठी काही शेतकऱ्यांनी शेताभाेवती तारा लावल्या आहेत तर काहींनी साडीचे कुंपण लावल्याचे येथील शेतकरी बस्वराज बावगे यांनी सांगितले.
नवनवीन प्रयोग...
रात्री शेतात कोणी राहात नसल्याने हरीण, रानडुक्कर हे भुईमुगाची नासधूस करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीही शेतात पहारा द्यावा लागत आहे. या प्राण्यांना पळवून लावण्यासाठी फटाके फोडावे लागत असल्याचे शेतकरी बस्वराज बावगे यांनी सांगितले.
***