पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचे ३ हजार ६५० बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार जिल्ह्यात संपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.
काय आहे न्यूमोकोकल?
न्यूमोकोकल ही लस असून, लहान मुलांना न्यूमोनिया होऊ नये म्हणून ती दिली जाते. न्यूमोनियाच्या संदर्भात अन्य लसीही दिल्या जातात. मात्र, २०१७-१८ मध्ये देशातील पाच राज्यांमध्ये न्यूमोकोकल लस दिली असून, आता महाराष्ट्र राज्याचा त्यात समावेश झाला असून, राज्यभर ती लस बालकांना दिली जाणार आहे.
जिल्ह्यात तीन टप्प्यांत लसीकरण
सहा वर्षांच्या आतील बालकांसाठी ही लस असून, पहिल्या दीड महिन्यातील बालकांना पहिला डोस दिला जाणार आहे. दुसरा डोस साडेतीन महिन्यांचा असणार आहे, तर नऊ महिन्यांनंतर बुस्टर डोस देण्याचा कार्यक्रम आरोग्य विभागाने हाती घेतला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
या आजाराची लक्षणे काय?
ताप, खोकला, सर्दी आदी लक्षणे असतात. श्वसन मार्गाला त्रास होतो. फुफ्फुसालाही संसर्ग होतो. धाप लागते. एकंदर, लहान मुलांना खाण्या-पिण्यास त्रास होतो. साधारण न्यूमोनिया आजाराची लक्षणे असतात. न्यूमोनिया होऊ नये म्हणून ही लस आहे.
शून्य ते सहा वयोगटातील बालकांना न्यूमोकोकल लस दिली जाणार आहे. बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाने हा कार्यक्रम हाती घेतला आहे. शासनाच्या निर्देशानुसार लसीकरणाची आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे.
- डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्याधिकारी.