चापोली : शेतकऱ्यांनी आता स्वतःच्या शेतातील पिकाची नोंद आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाने टाटा ट्रस्टच्या सहयोगाने ई-पीक पाहणी हे मोबाईलवरील ॲप विकसित केले आहे. शेतकरी त्याचा वापर करून आपल्या शेतातील पिकांच्या नोंदी गाव नमुना ७/१२मध्ये करू शकणार आहेत.
शेतकऱ्यांच्या ७/१२वर त्यांनी पेरलेल्या पिकांच्या नोंदी असणे आवश्यक असते. सध्या गाव नमुना ७/१२वर तलाठ्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची नोंद केली जाते. मात्र, प्रत्येकाच्या शेतात जाऊन पीक नोंद घेणे शक्य नव्हते. त्यामुळे शासनाकडे सादर केलेल्या माहितीत अचूकता नसायची. अंदाजे पीक पेरणी नोंदी घेतल्या जात असत. तलाठ्यांवरील कामाचा वाढता बोजा तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे महत्त्वाची कामे अशामुळे नोंदी घेण्यास विलंब लागत होता. परिणामी, शेतकऱ्यांची अडचण निर्माण होत असे. त्यामुळे शासनाने ई-पीक पाहणी हे मोबाईल ॲप तयार केले आहे. शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर ते डाऊनलोड करावे लागणार आहे. यात सर्वांना समजतील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
जे शेतकरी मोबाईलच्या माध्यमातून स्वतः ई-पीक पाहणी करणार नाहीत, त्यांच्या पिकांची नोंद ७/१२वर होऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांना पीक कर्ज, पीकविमा, कर्जमाफी, नैसर्गिक आपत्तीमधील अनुदान तसेच कृषी विभागाच्या विविध योजना मिळण्यास अडचणी येण्याची शक्यता आहे.
यावर्षीच्या खरिपातील संपूर्ण पीक पाहणीही या ॲपच्या माध्यमातून केली जाणार असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंदणी स्वतः करणे आवश्यक आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ई- पीक पाहणी या ॲपद्वारे करावी, असे आवाहन तलाठी बालाजी हाक्के व कृषी सहाय्यक पी. बी. गिरी यांनी केले आहे.
ई-पीक पाहणी ॲपवरून शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद केल्यास अचूक व गतीने माहिती संकलित होण्यास मदत होणार आहे. त्याचा उपयोग आधारभूत शासकीय खरेदी केंद्रावर शेतमाल विक्री करणे, पीककर्ज, पीकविमा, कर्जमाफी, नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप करणे, न्यायालयीन प्रकरणांसाठी होणार आहे.
पिकांबाबतचे दावे निकाली काढण्यास मदत...
ई-पीक पाहणीमुळे कृषी पतपुरवठा सुलभ करणे, पीकविमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य होणार आहे.
- शिवानंद बिडवे, तहसीलदार.
शेतकरी स्वतः भरणार पीक पाहणी अहवाल...
ई-पीक पाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांना स्वतः पीक पाहणी अहवाल भरता येणार आहे. तलाठी हे केवळ ॲप्रुव्हल देणार आहोत. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेत पीक पेरा प्रमाणपत्र लागणार नाही. तसेच पीकविम्याचा लाभ घेताना विमा कंपनीला आवश्यक कागदपत्रेही द्यावी लागणार नाहीत.
- बालाजी हाक्के, तलाठी, चापोली.