लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मग महाविद्यालये का सुरू केली जात नाहीत, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांनाही पडला आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनाही महाविद्यालये सुरू करण्याची मागणी करत आहेत.
जिल्ह्यात १३७ वरिष्ठ महाविद्यालये आहेत. या सर्व महाविद्यालयांमध्ये ३६ ते ३७ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, सध्या विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा सुरू होत आहेत. महाविद्यालये प्रत्यक्षात सुरू होण्याचे नाव नाही. याउलट आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कोरोना नियमांचे अनुपालन करून वरिष्ठ महाविद्यालयेही सुरू करावीत, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
प्राचार्यांची तयारी
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक होऊन त्या बैठकीत वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय होणार असल्याचे समजते. मात्र, अद्याप शासन, विद्यापीठाकडून निर्देश नाहीत. शासनाचे आदेश आल्यानंतर तत्काळ महाविद्यालये सुरू केली जातील. आमची तयारी आहे. - प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्याला शासनाने परवानगी दिली आहे. त्या धर्तीवर वरिष्ठ महाविद्यालयांना परवानगी देण्यास काहीच हरकत नाही. परंतु, अद्याप शासनाचे निर्देश नाहीत. पालक, विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय सुरू करण्याची मागणी होत आहे. शासन यासंदर्भात जो निर्णय घेईल, त्यानुसार महाविद्यालये सुरू करता येतील. - प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे
विद्यार्थी प्रतीक्षेत
कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालये सुरू केली पाहिजेत. गेल्या शैक्षणिक वर्षात नुकसान झालेले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी शासनाने तत्काळ निर्णय घेऊन सर्वच शाळा-महाविद्यालये सुरू करावीत. - प्रीतम दंदे
ऑनलाईन शिक्षण हा पर्याय होता. परंतु, प्रॅक्टिकलचे शिक्षण ऑनलाईन कसे मिळणार? त्यामुळे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता कोरोनाची रुग्णसंख्या घटलेली आहे. त्यामुळे शासनाने शाळा-महाविद्यालये सुरू करावीत. - अबोली चाटेकर