उदगीर तालुक्यातील गंडीघाटातून अवघड वळण घेत गेलेल्या नांदेड-बिदर राज्यमार्गावर असलेल्या हाकनकवाडी, वंजारवाडी व डोंगरशेळकी, किणी यल्लादेवी व जळकोट रोड, देगलूर रोडवर मोठमोठे डोंगर आहेत. हे डोंगर तालुक्याला एक वरदान ठरले आहेत. तसेच पावसाळ्यात या डोंगराने हिरवा शालू पांघरल्यामुळे आणखीनच वैभवात भर पडत आहे. गंडीघाटातील बालाघाटाच्या पर्वतरांगा रस्त्यावर दुतर्फा असल्याने येणा-या, जाणा-यांना आकर्षित करतात. या डोंगरमाथ्यावर अनेक पशुपक्षी वास्तव्यास असल्याने या डोंगराचे जतन होणे आवश्यक आहे. शासकीय मालमत्ता असलेल्या या डोेेेंगराचे अवैध मार्गाने केले जाणारे उत्खनन संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन तत्काळ थांबवावे, अशी मागणी निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे.
शासनाच्या महसुलावर परिणाम...
बालाघाटातील पर्वतरांगा उदगीर तालुक्याला मिळालेले नैसर्गिक वरदान आहे. तसेच या डोंगराळ भागातील हिरव्यागार वनराईत अनेक पशुपक्ष्यांचा वावर नेहमी असतो. शासकीय मालमत्ता असलेल्या या डोंगराचे अवैध उत्खनन होत असल्याने शासनाचा महसूलही बुडत आहे. तेव्हा या अनमोल संपत्तीचे जतन होणे आवश्यक आहे, असे उदगीर येथील निसर्गप्रेमी गुरुप्रसाद पांढरे यांनी सांगितले.