लातूर : पैसा, सोशल मीडिया आणि संशयावरून अनेक कुटुंबात कलह असल्याचे समोर आले आहे. केवळ किरकोळ कारणातूनही काही कुटुंब काडीमोड घेण्यापर्यंत पोहोचले आहेत. याप्रकरणी लातूरच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. दोघांत समजूतदारपणा आणि समन्वय असेल तर मनोमिलन घडू शकते.
कोरोनाच्या महामारीमुळे अनेक कुटुंबातील कर्त्या माणसाचा रोजगार हिरावला गेला. त्यातून आर्थिक संकट निर्माण झाले. यातूनच चिडचिडेपणा, रागवैताग आणि एकमेकांविषयी असलेला समज-गैरसमज हा टोकाच्या वादाला कारणीभूत ठरला. याच वादातून अनेकांनी महिला तक्रार निवारण केंद्राकडे धाव घेतली. यामध्ये समुपदेशन करण्याचा प्रयत्न संबंधित अधिकाऱ्यांकडून झाला. काही प्रकरणात तडजोड झाली आणि घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असलेल्या जोडीदाराचे मनोमिलन झाले. समजून घेण्याची वृत्ती नसलेल्या जोडीदारांची प्रकरणे कौटुंबिक न्यायालयात दाखल झाली. काही प्रकरणांत घटस्फोट झाला, तर काहींवर सुनावणी सुरू आहे. मध्यंतरी जवळपास आठ ते नऊ महिने न्यायालयाचे कामकाज कोरोनामुळे ठप्प होते. आता पुन्हा सुरू झाले आहे.
दोघेही कमावते असल्याने पैशाची चणचण नाही. मात्र, वैचारिक मतभेद असल्याचे काही तक्रारींत समोर आले आहे. त्यातून समजून घेण्याची वृत्ती नसल्याने वाद टोकाला गेले. यातूनच मग महिला तक्रार निवारण केंद्र आणि कौटुंबिक न्यायालयात प्रकरणे दाखल झाली.
- सचिन मोरे, समुपदेशक
शहरी आणि ग्रामीण भागातील कौटुंबिक वाद आणि तक्रारींमध्ये स्वतंत्र कारणे आहेत. जबाबदारी न घेणे, संयुक्त कुटुंब नको असणे, शिवाय एकमेकांतला समन्वय नसणे ही प्रमुख कारणे घटस्फोटाच्या प्रकरणात दिसून आली आहेत. पैसा हे कारण कमी असले तरी सोशल मीडिया आणि संशय हे प्रमुख आहे.
पैशाची चणचण आणि मोबाइलचे कारण
सध्या स्मार्ट फोनचे युग आहे. त्यातच सोशल मीडियातून होणारा संवाद हाही वादाचे कारण ठरत आहे. संशय हाच अनेक कुटुंबासाठी घातक ठरत आहे. केवळ समजूतदारपणा नसल्याने कलह वाढतो.