शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेंतर्गत सन २००१ साली नर्सिंग कॉलेजची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे २० विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली. नवीन कॉलेजमुळे जिल्हा व परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जीएनएमचे मोफत शिक्षण मिळू लागल्याने परिचर, परिचारिका होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा वाढला. यात ६ मुले आणि १४ मुलींना शिक्षण देण्यात येऊ लागले. सदरील कोर्स हा तीन वर्षांचा आहे. हळूहळू पदनिर्मिती होऊन कायमस्वरूपी प्राध्यापकांची नियुक्ती होईल, अशी आशा वाढू लागली.
दरम्यान, नर्सिंग कॉलेजसाठी प्राचार्य, किमान ६ प्राध्यापक, लेखापाल, शिपाई अशी पदनिर्मिती होणे अपेक्षित असताना, २० वर्षे उलटली, तरी अद्यापही पदस्थापना करण्यात आली नाही. त्यामुळे येथील नर्सिंग कॉलेज हे बाहेरील प्राध्यापकांवर अवलंबून आहे. येथे केवळ दोन शिपायांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली आहे. कायमस्वरूपी प्राध्यापक नसल्याने विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम होत आहे.
प्रस्ताव शासनाकडे सादर...
नर्सिंग कॉलेजमध्ये पदस्थापना करण्यात येऊन कायमस्वरूपी प्राध्यापक व अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, म्हणून तीन वर्षांपूर्वी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. प्रस्तावास मंजुरी मिळावी, म्हणून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. लवकरच मंजुरी मिळेल.
- डॉ.मोहन डोईबळे, अधिष्ठाता
शासन नियमाप्रमाणे प्रस्ताव...
शासनाच्या नियमाप्रमाणे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यासाठी सन २०१३ पासून पाठपुरावा करण्यात येत आहे. शासनाकडून लवकरच मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. मंजुरीनंतर सर्व समस्या दूर होतील.
- अश्विनी बेले, प्रभारी प्राचार्या.
टोलेजंग इमारत उभी...
वैद्यकीय विज्ञान संस्थेंतर्गतच्या नर्सिंग कॉलेजसाठी १८ कोटींपेक्षा अधिक खर्च करून तीनमजली इमारत बांधण्यात आली आहे. त्यामुळे वर्ग घेण्याची अडचण दूर झाली आहे. येथील अध्यापनाचे कार्य हे केवळ चार प्राध्यापकांवर असून, तेही अन्य कॉलेजचे आहेत. विशेष म्हणजे, वैद्यकीय विज्ञान संस्थेचे शासकीय रुग्णालय असल्याने, तिथे परिचारिकांची आवश्यकता भासते. अशा वेळी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची मदत होऊ शकते आणि या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षणही होऊ शकते.