जळकोट हा डोंगरी तालुका असून जिल्ह्यापासून सर्वात दूरचा हा तालुका आहे. तालुक्यातील आडत, भुसार, कापड व्यापारी व अन्य नागरिक विविध कामासाठी शिरूर ताजबंद मार्गे लातूरला ये-जा करीत असतात. हे अंतर अधिक असल्याने जळकोटातील नागरिकांची अडचण होते. येथून वेळेवर न पोहोचल्यामुळे काही वेळेस कामे अर्धवट ठेवून रात्री उशिरा परतावे लागते. जळकोट-शिरुर ताजबंद- लातूर अशी बससेवा सुरू झाल्यास या भागातील प्रवासी, व्यापारी व नागरिकांची सोय होणार आहे. त्यामुळे लातूर-शिरुर ताजबंद-जळकोट अशी बससेवा दिवसातून दोन ते तीनवेळा सुरू करावी. तसेच जळकोटला मुक्कामी बस सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
या मागणीसाठी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारुती पांडे, शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, जि.प. सदस्य बाबुराव जाधव, काँग्रेसचे उपाध्यक्ष दत्तात्रय पवार आदींनी पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.