जिल्हा परिषद सदस्या रूक्मिणबाई जाधव, बाजार समितीचे संचालक बाबूराव जाधव यांच्या विराळ ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या पॅनलचा पराभव झाला. विरोधकांनी ९ च्या ९ जागा जिंकल्या. जिल्हा परिषद सदस्य संतोष तिडके यांच्याही पॅनलचा पराभव झाला. त्यांच्या विरोधी गटाने बाजी मारली. घोणसीत दत्ता घोणसीकर यांच्या पॅनलने विजय मिळविला. ११ सदस्य असलेल्या अतनूरमध्ये राष्ट्रवादीच्या गव्हाणे गटाने दणदणीत विजय मिळविला. लक्षवेधी असलेल्या रावणकोळा ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सत्यवान पाटील दळवे यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे यांनी आपला गड राखला आहे. बोरगाव ग्रामपंचायतीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे शिवाजी केंद्रे यांनी सर्वाधिक तीन जागा जिंकल्या आहेत. विद्यमान सरपंच गोविंद केंद्रे यांनी दोन जागा तर तिसऱ्या पॅनलचे संजय केंद्रे यांनी दोन जागा जिंकल्या. शेलदरा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम पाटील यांनी वर्चस्व निर्माण केले आहे.
वडगावमध्ये विद्यमान सरपंच मंगेश गोरे यांच्या पॅनलला पराभव स्वीकारला लागला. बेळसांगवीत जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला. तिथे त्यांचे बंधू चंद्रपाल देवशेट्टे यांच्या पॅनलला दोन जागा मिळाल्या.
सोनवळा ग्रामपंचायतीवर २० ते २५ वर्षांपासून माजी जि.प. सदस्य चंदन पाटील नागराळकर यांचे वर्चस्व होते. त्यांनी ते अबाधित राखले आहे. अटीतटीच्या तिरंगी लढतीत त्यांच्या पॅनलने ९ पैकी ७ जागा जिंकल्या आहेत. त्यांच्या विरोधात असलेल्या भाजपचे तालुकाध्यक्ष अरविंद नागरगोजे यांच्या पॅनलचा पराभव झाला. चंदन पाटील व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील वगळता बहुतांश ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला आहे.