चाकूर : तालुक्यातील बनसावरगाव येथील स्मशानभूमीचे शेड, भाटसांगवीतील अंगणवाडीचे छत कोसळ्याच्या घटना घडल्या होत्या, तसेच जानवळ येथे सहा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीच्या छताला लोखंडी पाइपचा टेकू देण्यात आला. या घटना जवळपास तीन वर्षांपूर्वी घडल्या. त्याच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेने त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली होती; मात्र या समितीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे, चौकशी समितीतील एक सदस्य सेवानिवृत्त झाले आहेत.
बनसावरगाव येथे जनसुविधा योजनेंतर्गत सार्वजनिक स्मशानभूमीचे बांधकाम सहा वर्षांपूर्वी करण्यात आले होते. शेड उभारणीवर ४ लाख खर्च झाला होता. २०१३ मध्ये हे काम पूर्ण झाले; परंतु सहा वर्षांत हे शेड कोसळले. गावात अंत्यविधीसाठी दुसरी जागा नव्हती. त्यामुळे विद्यमान सरपंच नीलेश भंडे यांनी नव्याने शेड उभारणीची मागणी केली. चार महिन्यांपूर्वी ६ लाख २५ हजार खर्चून बांधकाम पूर्ण केले; परंतु पूर्वीच्या पडलेल्या शेडचा चौकशी अहवाल अद्याप समोर आला नाही.
भाटसांगवी येथील अंगणवाडीच्या छताचा गिलावा कोसळून चार विद्यार्थी जखमी झाले. त्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. जानवळ येथे दोन स्मशानभूमी आहेत. त्यापैकी सार्वजनिक स्मशानभूमीत सन २०१२-१३ मध्ये साडेचार लाख खर्चून सिमेंट शेड बांधण्यात आले. एक- दोन वर्षांपूर्वी या शेडची परिस्थिती पाहता शेड केव्हाही कोसळू शकतो, असे दिसू लागल्याने सदरील शेडला लोखंडी पाइपचा टेकू देण्यात आला. अंत्यसंस्कारासाठी गेलेल्यांना जीव मुठीत धरुन थांबावे लागत आहे.
जानवळ येथील माळी गल्लीतील अंगणवाडी क्र. ७ ची इमारत धोकादायक होती. २०११- १२ मध्ये या अंगणवाडीच्या बांधकामावर ४ लाख ५० हजार खर्च झाले होते. पाया मजबूत नसल्याने इमारत केव्हाही ढासळू शकते. अशा धोकादायक इमारतीत अंगणवाडी भरली जात होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये या धोकादायक इमारतीसंदर्भात लोकमतमधून वृत्त प्रसिद्ध होताच पंचायत समितीचे उपगटविकास अधिकारी आकाश गोकनवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि पर्यायी जागेत अंगणवाडी भरविण्याचे आदेश दिले. दरम्यान, जिल्हा परिषदेचे उपअभियंता एस.टी. निकम यांनी अंगणवाडीची प्रत्यक्ष पाहणी करून सदरील इमारतीत अंगणवाडी भरवू नये, असा अहवाल दिला होता. दरम्यान, तिथेच नव्याने दुसरी इमारत बांधकाम सुरू आहे. त्यावर आता ८ लाख ५० हजार रुपये खर्च होत आहे. इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे.
जनतेच्या हितासाठी शासन लाखो रुपये खर्चत आहे; परंतु प्रत्यक्षात कामाचा दर्जा योग्य राहत नसल्याने त्यावर जिल्हा परिषदेने एक त्रिसदस्यीय समिती गठित केली. या चारही कामांची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले. या समितीचा अहवाल अद्याप समोर आला नाही. या समितीतील एक अधिकारी चार महिन्यांपूर्वी निवृत्त झाला आहे.
चुकीच्या कामाला ब्रेक लावा...
विकास कामे ही गुणवत्तापूर्ण व्हावीत. जानवळ, सावरगाव, भाटसांगवी येथील प्रकरणे गंभीर आहेत. त्याचा चौकशी अहवाल समोर येत नाही. यातील दोषींविरुद्ध कारवाई व्हावी. जे जबाबदार आहेत, त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच आणून नुकसान भरपाई वसूल करावी.
- मिलिंद महालिंगे, माजी नगराध्यक्ष.
दोषींवर निलंबनाची कारवाई हवी...
बनसावरगाव व जनावळ येथील स्मशानभूमी, भाटसांगावी येथील अंगणवाडीवर जो खर्च झाला. तो दोषींकडून वसूल करावा, तसेच त्यांना निलंबित करावे. याप्रकरणी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
- नागनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते.