किल्लारी (जि. लातूर) : हिंगोली जिल्ह्यातील एकाचा खून करुन त्याचा मृतदेह चलबुर्गा (ता. औसा) येथील ऊसाच्या फडात टाकल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे.
इसुफ नन्नू औरंगाबादपुरे (३५, रा. गारमाळ, ता. जि. हिंगोली) असे मयताचे नाव आहे. किल्लारीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड व बीट जमादार सचिन उस्तुर्गे यांनी सांगितले की, इसुफ औरंगाबादपुरे यांच्याकडे चारचाकी वाहन असून, हिंगोलीतील काहींनी त्यांची गाडी भाड्याने आणली होती. दरम्यान, इसुफ औरंगाबादपुरे यांचा खून करून त्यांचा मृतदेह किल्लारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चलबुर्गा येथील एका ऊसाच्या फडात टाकून संबंधित पसार झाले. याप्रकरणी हिंगोली पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली होती. या घटनेच्या तपासादरम्यान हिंगोली पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी करत संबंधित वाहन जप्त केले. यावेळी तिघांनी चलबुर्गा येथील ऊसाच्या फडात औरंगाबादपुरे यांचा मृतदेह टाकल्याचे सांगून जागा दाखवल्याने हिंगोली पोलिसांनी बुधवारी सकाळी मृतदेह ताब्यात घेतला. हिंगोली पोलिसांना किल्लारीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, बीट जमादार सचिन उस्तुर्गे यांनी सहकार्य केले.