उपजिल्हाधिकारी, अन्न औषध प्रशासनाचे निरीक्षक तसेच नोडल अधिकाऱ्यांनी ८ मे रोजी हॉस्पिटलला भेट दिली होती. त्यावेळी एकूण ६९ रुग्ण दाखल होते. परंतु, त्यावेळी रुग्णालयात केवळ दोन आरएमओ उपस्थित होते. आयसीयूमध्ये इन्टेसिव्हिस्ट आणि फिजिशिएन उपस्थित नव्हते. फायर सेफ्टीच्या समाधानकारक उपाययोजना आढळून आल्या नाहीत. तसेच रुग्णांना रेमडेसिविरचा वापर प्रोटोकॉलनुसार नसल्याचे निदर्शनास आले. रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन बाहेरून आणण्यासाठी प्रिस्क्रिप्शन लिहून दिल्याचे दिसून आले. आयसोलेशनचे नियम पाळले जात नव्हते. रुग्णांजवळ रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते. कोविड हेल्थ सेंटरच्या अनुषंगाने नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे १२ मे पासून सनराईज हॉस्पिटलमध्ये नवीन कोविड रुग्ण दाखल करून घेऊ नयेत, असेही जिल्हा शल्य चिकित्सकांनी म्हटले आहे.
रुग्णालयात नॉनकोविड सेवा सुरू कराव्यात
सध्या रुग्णालयात जे उपचार घेत आहेत, त्यांना सुटी झाल्यानंतर नव्याने कोरोनाबाधित रुग्ण दाखल करून घेऊ नयेत. रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण करून तिथे नॉनकोविड सेवा सुरू कराव्यात तसेच त्यानंतर सनराईज हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ रुग्णांवर उपचार करू नयेत, असे जिल्हा शल्यचिकित्सक तथा कोरोनाचे नोडल अधिकारी डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.