आरोग्य विभागाने जिल्ह्यात २०१८ मध्ये एमआर लसीकरण केले आहे. पंधरा वर्षे वयोगटापर्यंतच्या सर्वच मुला-मुलींचे लसीकरण झालेले आहे. शंभर टक्के लसीकरण त्यावेळी करण्यात आले आहे. त्यानंतर गोवर अथवा पुरळ असलेले रुग्ण आढळलेले नाहीत. जर एखाद्या गावात पुरळ, कांजण्या असलेल्या एखाद दुसरा रुग्ण आढळला तर त्या गावात सर्वेक्षण करण्यात येते. गोवर पुरळ असल्याची खात्री झाल्यानंतर तात्काळ औषधोपचार करण्यात येतो. मात्र, जिल्ह्यात सद्य:स्थितीत असे रुग्ण नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले.
100% गोवर- रुबेलाचे लसीकरण....
सध्या जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. हे रुग्ण कमी होत नाही तोपर्यंतच डेंग्यू, मलेरिया आजारांनी डोके वर काढले आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभाग जनजागृती करीत आहे. गोवर आजाराचे रुग्ण आपल्या जिल्ह्यात नाहीत; परंतु २०१८ मध्ये पंधरा वर्षे वयोगटापर्यंतच्या सर्व मुला-मुलींचे लसीकरण करण्यात आले आहे.
कोट....
जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागामध्ये अशा अंगणवाडी कार्यकर्ती यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणातही गोवर, पुरळ आजाराचे रुग्ण आढळलेले नाहीत. सर्दी, ताप, खोकला असलेल्या रुग्णांच्या आमच्याकडे नोंदी असतात. सध्या कोणताही ताप अंगावर काढू नये. लोकही काढत नाहीत. जनजागृती झाली आहे. डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी.