उपवासाच्या पदार्थांची श्रावण आणि आषाढी एकादशीला माेठ्या प्रमाणावर मागणी असते. यावेळी बाजारातही या पदार्थांची माेठी आवक असते. मात्र, दरवर्षी दहा ते पंधरा टक्के दर वाढलेले असतात. यंदाही शेंगदाणे, साबुदाणा आणि भगरीचे दर पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत. त्याचबराेबर केळीही ४० ते ५० रुपये डझन मिळत आहेत. अशा स्थितीत श्रावणातील उपवास अनेकांसाठी महागला आहे.
आवक घटली, मागणी वाढली...
साबुदाणा
लातूरसह जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा या प्रमुख बाजारपेठांतील साबुदाण्याची आवक घटली आहे. मात्र, मागणी वाढली आहे. परिणामी, यातून प्रतिकिलाेचे दर वाढले आहेत.
श्रावणातील मागणी लक्षात घेऊन पुरवठा हाेणे अपेक्षित आहे. मात्र, आवकच घटल्याने भाव वाढले आहेत, असे दुकानदारांनी सांगितले.
शेंगदाणा
सध्याला शेंगदाण्याचे प्रतिकिलाेचे दर वाढले आहेत. पाच रुपयांनी उपवासाचे पदार्थ महागले आहेत. गतवर्षी हे दर १० रुपयांनी कमी हाेते. यंदा मात्र आषाढी आणि श्रावणातील उपवासामध्ये यात पाच रुपयांची वाढ झाली आहे.
भगरीचे दर स्थिर...
साबुदाणा, शेंगदाण्यानंतर भगरीला माेठी मागणी असते. यंदा मात्र भगरीचे प्रतिकिलाेचे दर १०५ रुपये आहेत. उपवासासाठी भगर माेठ्या प्रमाणावर वापरली जाते. मात्र, साबुदाणा आणि शेंगदाण्याला अधिक मागणी आहे. यातून त्यांचे दर पाच रुपयांनी वधारले आहेत.
मागणी दुप्पट वाढली...
श्रावण महिन्यात उपवास करणाऱ्यांची संख्या माेठ्या प्रमाणावर असते. दरम्यान, याच काळात उपवासाच्या पदार्थांची माेठी मागणी असते. अशा काळात शेंगदाणा, साबुदाणा आणि भगरीची मागणी अचानक दुपटीवर जाते. मागणी अधिक आणि आवक घटली की, भाव वाढतात.
- बसवराज वळसंगे, व्यापारी, लातूर