सोयाबीनवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांकडून सोयाबीनला मागणी वाढल्याने सोयाबीनचे दर गत महिन्यात ४ हजार २५० रुपयांपर्यंत पोहोचले होते. आता ते टप्प्याटप्प्याने वाढत जात आहेत. गुरुवारी पाच हजारांपर्यंत भाव पोहोचला. शासनाने वाढत्या खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने खाद्यतेलावरील आयात शुल्क दहा टक्क्यांनी कपात केली. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. त्यामुळे पामतेलाचे भाव वाढत आहेत. त्यातच देशातील पेंडीला युरोप व दक्षिण आशिया खंडातील व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, आदी देशातून चांगली मागणी असल्याने सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे.
येथील मार्केट यार्डात २०१४ नंतर आतापर्यंतचा सर्वोच्च दर ठरला. तीन महिन्यांपासून मार्केट यार्डात नवीन सोयाबीनची आवक आहे. सुरुवातीला आवक कमी होती. परंतु, महिनाभरापासून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची आवक वाढली आहे. त्यामुळे सोयाबीनवर प्रक्रिया करणाऱ्या स्थानिक व बाहेरील कारखानदारांकडून मागणी चांगली होती. त्यातच सोयाबीनच्या तेलालाचा उठाव असल्याने व्यापाऱ्यांनी जोरदार खरेदी केली आहे.
शेतकऱ्यांतून समाधान...
बाजारात खाद्यतेलाच्या किमती वाढत असल्याने सामान्य ग्राहकांत नाराजीचा सूर उमटत होते. त्यामुळे शासनाने आंतरराष्ट्रीय बाजारातून आयात होणाऱ्या खाद्यतेलाच्या किमतीवरील शुल्कात १० टक्के कपात केल्याने खाद्यतेलाच्या किमती काही दिवस कमी झाल्या होत्या. परंतु, मागणी वाढल्याने पुन्हा सोयाबीनचे दर वाढू लागले. मागील महिन्यात चार हजारपर्यंत उतरलेले दर टप्प्याटप्प्याने वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागणी व पुरवठ्यात तफावत...
यंदा देशात सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे. त्यातच आयात होणारे पामतेलाचे दही वाढत आहेत. त्यामुळे खाद्यतेलाच्या मागणी व पुरवठ्यातील तफावत पाहता सोयाबीनच्या तेलाचे भाव वाढत आहेत. तसेच यंदा भारतातील सोया पेंडीला दक्षिण कोरिया, व्हिएतनामसह युरोप खंडातून मागणी होत आहे.
- सागर महाजन, सोयाबीन कारखानदार.