कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकजण घरीच राहणे पसंत करत आहेत. त्यातच मे महिना सुरू असल्यामुळे प्रचंड प्रमाणात तापमानात वाढ होऊन उकाडा जाणवत आहे. रात्रंदिवस पंखे, कुलर सुरू ठेवावे लागत आहेत. तालुक्यातील दैठणा येथील बसस्थानक परिसरास विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. किटकॅट, केबल, लोंबकळणाऱ्या विद्युत तारा, विद्युत खांबावरील चिमण्या, डीओच्या तारा, फ्युज तारा आदी साहित्यांची दुरावस्था झाल्याने बसस्थानक परिसरासह निम्मे गाव दररोज अंधारात राहत आहे.
बसस्थानक परिसरातील ट्रान्सफॉर्मवरून कृषी पंपास वीज कनेक्शन देण्यात आले आहे. कृषी पंप आणि गावचा विद्युत पुरवठ्यामुळे अधिक भार येत आहे. परिणामी, समस्या निर्माण होत आहे. निम्म्या गावाचा विद्युत पुरवठा दररोज खंडित होत आहे.
अधिकृत मीटरधारक अंधारात...
बसस्थानक परिसरात जवळपास २० पेक्षा अधिक मीटरधारक आहेत. परंतु, अधिक भार पडण्याची समस्या आणि ट्रान्सफॉर्मरची दुरावस्था यामुळे निम्मे गाव अंधार राहत असल्याने अधिकृत मीटरधारकांनाही अंधारात रात्र काढावी लागत आहे.
गावाशेजारील ट्रान्सफॉर्मर सुरू करणार...
याबाबत महावितरण कार्यालयाचे उपविभागीय अभियंता जोंधळे म्हणाले, ट्रान्सफॉर्मरची दुरूस्ती करण्यात येईलच, त्याचबरोबर बसस्थानक परिसरासाठी गावाशेजारी असलेले नवे ट्रान्सफॉर्मर सुरू करून त्यावरून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.