उदगीर : मागील महिन्यात पडलेल्या पावसामुळे पिके चांगलीच बहरली होती. मात्र, महिनाभर पावसाने उघडीप दिल्याने बहरलेली पिके सुकून जात होती. काही भागात सोयाबीनला फुलं लागत असताना पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले होते. तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर अखेर सोमवारी रात्री उदगीर शहर व परिसरात पावसाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. खरिपाच्या पिकांना तात्पुरता आधार मिळाला असून, मोठ्या पावसाची आशा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
उदगीर तालुक्यात मृग नक्षत्राने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. अधूनमधून पडत असलेल्या रिमझिम पावसामुळे सर्वच भागात पीकपरिस्थिती उत्तम होती. काही भागात सोयाबीनला फुलं लागण्याची प्रक्रिया सुरू झाली तर काही भागात शेंगा लागण्यास सुरुवात झाल्याने पावसाची गरज असतानाच पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मागील काही वर्षांपासून उदगीर तालुक्यात सोयाबीन हे प्रमुख पीक बनले आहे. चांगले उत्पादन देण्याची क्षमता सोयाबीनमध्ये असल्याने शेतकऱ्यांचा सोयाबीनचे पीक घेण्याकडे कल वाढला आहे. त्यातच पेरणीच्या वेळी सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने याहीवर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीच्या क्षेत्रात दोन हजार हेक्टरने वाढ केली आहे. तालुक्याचे खरिपाचे ६४ हजार हेक्टर क्षेत्र असून सर्वाधिक ४४ हजार ५६५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. त्यापाठोपाठ तूर १२ हजार ९६५ हेक्टर, ज्वारी १ हजार ९३६ हेक्टर, उडीद १ हजार २०५ हेक्टर, मूग १ हजार ५४३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही भागात झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यात पेरणी झाली. पेरण्या झाल्यानंतर अनेक भागात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे काही भागात खोड अळींचा प्रादुर्भाव दिसून आला. शेतकऱ्यांनी महागडे औषध घेऊन त्याचा बंदोबस्त केला. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पावसानंतर २५ दिवस पावसाने उघडीप दिल्याने पिके दुपार धरू लागली होती. दीर्घ विश्रांतीनंतर सोमवारी पडलेल्या पावसाने खरिपाच्या पिकाला तात्पुरते जीवदान मिळाले आहे.
पिकांना मिळाला तात्पुरता दिलासा...
मागील पंचवीस दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. सोमवारी पडलेल्या पावसाने केवळ माना टाकलेल्या पिकाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. खरिपाच्या पिकावरील संकट अद्याप टळलेले नसून मोठ्या पावसाची नितांत गरज आहे. बाबूराव मलकापुरे, शेतकरी.
आतापर्यंत ६१८ मि.मी. पावसाची नाेंद...
आतापर्यंत उदगीर तालुक्यात सर्वाधिक ६१८ मि.मी. पाऊस झाला आहे. सोमवारी रात्री उदगीर महसूल मंडळात ५, नागलगाव २, मोघा ३, हेर २६, वाढवणा १८, नळगीर ६, देवर्जन १५ तर तोंडार मंडळात १६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.