लातूर : मागील वर्षी मार्च-एप्रिल महिन्यापासून राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी आवश्यक असलेल्या मास्क, सॅनिटायझरला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. मेडिकल, जनरल स्टोअर्स, विविध दुकानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॅनिटायझर विक्रीसाठी उपलब्ध झाले. गेल्या वर्षभरात सॅनिटायझरची विक्री ९० टक्क्यांवर पोहोचली होती; मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जानेवारी ते फेब्रुवारी २०२१ या महिन्यात सॅनिटायझरच्या मागणीत ४० टक्के घट झाली आहे. परिणामी, कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सॅनिटायझरचा वापर मात्र घटला असल्याचे चित्र आहे. कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी प्रत्येकाच्या घरी सॅनिटाझरचा वापर केला जातो. प्रारंभी अनेक जण बाहेर जाताना सॅनिटायझरची बॉटल जवळ बाळगत असत; मात्र प्रत्येक ठिकाणी संबंधितांच्यावतीने प्रवेशद्वारावर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येऊ लागली. त्यामुळेही काही प्रमाणात सॅनिटायझरचा वापर कमी होत गेला, तर अनेकांनी कोरोनाचा संसर्ग कमी झाला म्हणत उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले. सध्या गतवर्षीच्या तुलनेत केवळ ४० टक्के सॅनिटायझरची विक्री होत आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्स या उपाययोजनांचा काटेकाेर अवलंब करणे आवश्यक झाले आहे.
४० टक्के विक्रीत घट...
कोरोनाचा संसर्ग कमी झाला, असे समजून अनेकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर कमी केला. परिणामी, सॅनिटायझरला मागणी घटली. मार्च महिन्यापासून रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक झाले आहे.
सुरुवातीला कोरोनापासून बचावासाठी प्रत्येकाच्या घरी सॅनिटायझरचा वापर केला जात असल्याचे चित्र होते; मात्र रुग्णसंख्या कमी होत असल्याने वापर घटला. अनेक ठिकाणी तर प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध असल्याने अनेकांनी सोबत सॅनिटायझरची बॉटल ठेवणे कमी केले.
कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्येकाला उपाययोजनांची जाणीव झाली. त्यामुळे मास्कचा वापर वाढला. त्यातच प्रशासनाच्यावतीने विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्याने मास्कचा वापर अनिवार्य झाला आहे. त्यामुळे मास्कच्या विक्रीत वाढ झाली असल्याचे चित्र आहे.
मास्क, फिजिकल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचा वापर केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येईल. प्रत्येकाने नैतिक जबाबदारी समजून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. - रामदास भोसले, लातूर जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन
गेल्या वर्षभरापासून आम्ही आणि कुटुंबातील सर्व सदस्य सॅनिटायझर आणि साबणाचा नियमित वापर करतो. बाहेर जाताना मास्क वापरतो. प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. - योगेश पाटील, नागरिक.
मुलांसह घरातील प्रत्येक जण कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करतो. मास्कचा वापर नियमित केला जातो. लहान मुलांना वेळोवेळी साबणाने हात धुण्याच्या सूचना करतो. - दत्ता उगिले, नागरिक.