येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्या वाढल्याने गर्दी होत आहे. परिणामी, लसीकरणाला अडथळा निर्माण होत असल्याने नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी पुढाकार घेऊन दापका वेस येथे नगरपालिकेच्या इमारतीमध्ये लसीकरण केंद्र सुरू केले. मात्र, दररोजच्या लसीच्या तुटवड्यामुळे अनेकांना परत जावे लागत आहे. लसीकरण वितरणातही गोंधळ होत आहे.
मंगळवारी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन शासकीय वेळापत्रकानुसार दिले जाणार होते. मात्र, केंद्रावर प्रचंड गर्दी असल्यामुळे दोन तास काम ठप्प झाले. यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी पोलीस उपाधीक्षक दिनेशकुमार कोल्हे यांना पोलीस बंदोबस्त मागितला होता. मात्र तो वेळेत न पोहोचल्यामुळे लसीकरण केंद्रावर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र पोलीस येताच आणखी गोंधळ उडाला. या परिस्थितीची माहिती अरविंद पाटील निलंगेकर यांना समजताच त्यांनी केंद्रावर भेट दिली आणि लसीकरणास आलेल्या नागरिकांची समजूत काढली. त्यानंतर लसीकरणास सुरुवात झाली.