घोणसी येथील शेतकरी दीपक बब्रुवान आब्रे यांनी आपल्या शेतात ९ महिन्यांपूर्वी आंबा ३२०, जांब १३० आणि जांभूळ १०० झाडांची तर बाळाजी कोंडिबा गोदाजी यांनी ५० आंब्याच्या झाडाची लागवड केली होती. ९ महिन्यांपासून रोपांना खत, ठिंबकद्वारे पाणी देऊन आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे जपले होते. शिवारातील ऊस कारखान्याला गेल्याने शिवार उघडे पडले असून, रानडुकरांना खाण्यासाठी काही उरलेच नाही. परिणामी, रानडुकरांच्या कळपाने आता हिरव्या रोपावर हल्ला चढविला आहे. दरम्यान, दहा महिन्यांपासून रोपाची जोपासणा करून झाडे गुडघ्याला आली होती. विविध नमुन्याची फळाची झाडे लावून कायमस्वरूपी उत्पन्न घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, झाडाला फळ लागण्याआधीच रानडुकरांनी झाडांची नासाडी करून रान काळेभोर केले आहे. रानडुकरांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्यात यावी, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक काेंडी...
शेतीत कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडत असल्याने कष्ट करूनही पदरात काहीच पडत नाही. शेतीत कायमस्वरूपी उत्पन्न मिळावे यासाठी साडसहाशे विविध फळाची लाखो रुपयांचा खर्च करत झाडांची लागवड केली हाेती. मात्र, रानडुकरांच्या कळपाने शेतातील एकही झाड शिल्लक ठेवले नाही. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने रानडुकरांचा बदोबस्त करून, सदर शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी दीप आंब्रे यांनी केली आहे.