विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शनिवारी १४९ जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १३० जणांचा अहवाल निगेटीव्ह तर १६ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. ३७९ जणांची रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये ३७९ निगेटीव्ह तर १९ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. प्रयोगशाळेतील चाचणी आणि रॅपिड ॲन्टीजन चाचणी असे दोन्ही ३५ जण पॉझिटीव्ह आढळले आहे. जिल्ह्यात सध्या ३६० जणांवर उपचार सुरु असून त्यापैकी १०६ रुग्ण होमआयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्यांवर भर दिला जात आहे. जिल्ह्यात रुग्ण दुपटीचा कालावधी ५३६ दिवसांवर असून, मृत्यदर २.९ टक्क्यांवर आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४१ टक्के असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख यांनी सांगितले.
३९ जणांनी केली कोरोनावर मात...
शनिवारी जिल्ह्यातील ३९ जणांची प्रकृती ठणठणीत झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सुटी देण्यात आली. यामध्ये समाजकल्याण वसतीगृह कव्हा रोड लातूर येथील १२, खाजगी रुग्णालयातील १२ तर होमआयसोलेशनमधील १५ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ९०८ जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ७ हजार ६७५ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर ९० हजार ८६३ जणांची रॅपिड ॲन्टीजन चाचणी करण्यात आली असून त्यापैकी १४ हजार ३८० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.