अहमदपूर : खरिपासाठी तालुक्यातील २४ बँकांमार्फत २३ हजार ३३४ शेतकऱ्यांना १२२ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. उद्दिष्टापेक्षा ८ कोटींचे वाटप कमी झाले आहे. दरम्यान, पीककर्जासाठी शेतकऱ्यांचे सातत्याने हेलपाटे होत असल्याचे पाहावयास मिळत आहेत.
कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना जुने-नवे करून कर्ज देण्यासंदर्भात शासन सूचना असतानाही बँकांनी आडमुठे धोरण राबविले होते. तसेच विनाकारण प्रकरणे प्रलंबित ठेवणे, अवाजवी कागदपत्रे मागणे, उद्दिष्ट संपल्याचे सांगणे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यासंदर्भात तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व बँकांची बैठक घेण्यात येऊन पीककर्ज आढावा घेण्यात आला. तालुक्यातील २४ बँकांना १३० कोटी ७८ लाखांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. जूनअखेरपर्यंत बँकांनी २३ हजार ३३४ शेतकऱ्यांना १२२ कोटी ३४ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. उद्दिष्टापेक्षा ८ कोटीने कमी असल्याचे आढळून आले.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहमदपूर व शिरूर ताजबंद शाखेने कमी वाटप केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या अहमदपूर व शिरूर ताजबंद शाखेने सर्वाधिक कर्जवाटप केले आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १० शाखांनी सर्वाधिक ८८ कोटींचे कर्जवाटप केले. त्याचा १९ हजार ५४० शेतकऱ्यांना लाभ झाला. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या किनगाव शाखेने वाटप केले असून केवळ ८६ शेतकऱ्यांना ५१ लाखांचे कर्ज देण्यात आले आहे. एचडीएफसीने केवळ १२ शेतकऱ्यांना ३४ लाख वाटप केले आहे. बँकांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. गरजू शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन पीककर्ज घ्यावे, असे आवाहन महसूलच्या वतीने करण्यात आले आहे.
पीककर्ज नाकारल्यावर कार्यवाही...
शेतकऱ्यांना विनाकारण हेलपाटे मारण्यास लावणे. अनावश्यक कागदपत्रांची मागणी करणे, प्रकरण प्रलंबित ठेवणे, पात्र लाभार्थ्यांना दिरंगाई करणे अशा काही तक्रारी महसूल विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याची शहानिशा करण्यात येईल. त्यात पीककर्ज नाकारणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.
सर्व शेतकऱ्यांना पीककर्ज...
खरीप हंगामासाठी प्रत्येक बँकेला उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्या उद्दिष्टापर्यंत बँकांनी नियमाप्रमाणे कर्जवाटप करावे, असे साहाय्यक निबंधक व्ही.व्ही. घुले यांनी सांगितले.
पीक कर्जाला नकारघंटा...
बहुतांश बँका पीककर्जासाठी आवश्यक कागदपत्रे मागून शेतकऱ्यांना हेलपाटे मारण्यास लावत आहेत. याबाबत वेळोवेळी तक्रार केली असतानाही त्यास अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे शेतकरी माधव तुडमे, बळीराम तुडमे यांनी सांगितले.