खरोसा : औसा तालुक्यातील खरोसा ग्रामपंचायतीची स्थापना होऊन ६८ वर्षांचा कालावधी उलटत आहे. या कालावधीत चारवेळा महिलांनी गावच्या सरपंचपदाचा मान मिळवित गावचा कारभार सांभाळला तर १४ पुरुषांनी या पदावर कार्य केले आहे.
खरोसा ग्रामपंचायतीची स्थापना १९५२ मध्ये झाली. पहिल्यांदा औशाच्या तहसीलदारांनी गावात येऊन नियुक्त सरपंच म्हणून बसवंतराव सांगवे यांची निवड केली होती. सन १९५७ च्या ग्रामपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर श्रीमंत डोके यांनी सरपंचपदाचा मान मिळविला. नियुक्त निवडीत बसवंतराव सांगवे पहिले सरपंच तर सार्वत्रिक निवडणुकीतील पहिले सरपंच श्रीमंत डोके होय.
सन १९५२ ते २०२० या ६८ वर्षांच्या कालावधीत अरुणा साळुंके या पहिल्या महिला सरपंच झाल्या. मागास प्रवर्गातील पंडू कांबळे यांनाही सरपंचपदाची संधी मिळाली होती. गिरमलअप्पा तोलमारे, विठ्ठलराव खरपडे आणि भीमाशंकर डोके या तिघांनाच सरपंचपदाची दोनवेळा लॉटरी लागली. एकूण १३ पंचवार्षिक निवडणुका झाल्या. त्यामध्ये १८ सरपंचांची कारकीर्द झाली. यात सर्वसाधारण पुरुष १०, महिला २ तर इतर मागास प्रवर्गातील महिला २ राहिल्या.
दोनदा बिनविराेध सरपंच...
खरोसा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दोघांची सरंपच म्हणून बिनविराेध निवड झाली होती. तसेच दाेन सरपंचांवर अविश्वास ठराव मंजूर झाला होता. सन १९८९ पर्यंत गावात ४ प्रभाग आणि ११ सदस्यांची संख्या होती. त्यानंतर एक प्रभाग वाढून ५ अशी संख्या झाली तर २ सदस्यांची संख्या वाढल्याने एकूण संख्या १३ वर पोहोचली.