प्रत्येकापर्यंत शिक्षण पोहोचावे हा या उपक्रमाचा उद्देश असून, ३० दिवसांपेक्षा जास्त दिवस शाळेत गैरहजर राहणाऱ्या मुलांना शाळाबाह्य गृहीत धरण्यात येते. कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे मोठ्या शहरातून ग्रामीण भागात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न या मोहिमेद्वारे केले जाणार आहेत. जिल्ह्यात प्राथमिकच्या १ हजार २८० शाळा असून त्यामध्ये १ हजार ९३५ बालरक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. वाडी, वस्ती, वीटभट्टी, ऊसतोडणीची ठिकाणे, औद्योगिक परिसरात इतर ठिकाणाहून आलेल्या मजुरांच्या वसाहती आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन मुलांची चौकशी केली जाणार आहे. या मोहिमेत बालरक्षक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडीसेविका, शालेय शिक्षकांना सहभागी करून घेण्यात आले असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
विविध घटकांचा मोहिमेत सहभाग...
विविध संस्था, संघटना, स्वयंसेवी संस्था, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडीसेविका, बालरक्षक यांच्या माध्यमातून वाडी, वस्ती, वीटभट्टी, औद्योगिक वसाहती आदी ठिकाणी शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविली जात आहे. मोहिमेबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेला शिक्षण विभागाच्या वतीने सुरुवात करण्यात आली असून, बालरक्षक तसेच मोहिमेत सहभागी असणाऱ्या घटकांना सूचना करण्यात आल्या आहेत.
तालुकास्तरावर बैठक...
शोधमोहिमेसाठी प्रत्येक तालुकास्तरावर बैठक घेण्यात आली आहे. शाळानिहाय बालरक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत.
प्रत्येक बालकापर्यंत शिक्षण पोहोचवणार...
शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित असलेल्या प्रत्येक बालकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा मानस आहे. जिल्ह्यात या उपक्रमाला सुरुवात झाली असून, प्रभावीपणे शोधमोहीम राबविली जाणार आहे. - भगवान फुलारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी
जिल्ह्यातील प्राथमिक शाळा - १२८०
जिल्ह्यातील नियुक्त बालरक्षक - १९३५
तालुकानिहाय नियुक्त बालरक्षक
अहमदपूर - २३२
औसा - १८५
चाकूर - २२४
देवणी - १०१
जळकोट - १०९
लातूर - २७२
निलंगा - २०८
रेणापूर - २२४
शि. अनंतपाळ - १४२
उदगीर - २३८