जळकोट : तालुक्यात मजुरांची संख्या जवळपास २५ हजार असली तरी सध्या प्रशासनाच्या वतीने केवळ १२ कामे सुरू असून, त्यावर १२० मजूर आहेत. बहुतांश मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने मजुरांचे शहरांकडे स्थलांतर होत असल्याचे दिसून येत आहे.
जळकोट तालुका हा डोंगरी व माळरानाचा म्हणून ओळखला जातो. तालुक्यात केवळ खरीप हंगाम घेतला जातो. सिंचनाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने शेतकरी शेतीबरोबर पशुपालन व्यवसाय करीत आहेत. तसेच तालुक्यात वाड्यातांड्यांची संख्या अधिक असून, ऊसतोड कामगारांची संख्याही जास्त आहे. दरम्यान, तालुक्यात एकूण मजूर जवळपास २५ हजार असून, त्याची महसूल प्रशासनाकडे नोंद आहे.
दरम्यान, तहसील कार्यालयाकडून कामे कमी करून ती वनविभागाकडे देण्यात आली आहेत. मात्र, तालुक्यात वनविभागाच्या रोपवाटिका व इतर कामे कुठे सुरू आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे. पंचायत समितीकडून घरकूल, शोषखड्ड्यांसह अन्य १२ कामे सुरूर असून, त्यावर केवळ १२० मजूर काम करीत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हाताला काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तालुक्यातील मजूर मुंबई, पुणे, सोलापूर, निजामाबाद अशा मोठ्या शहरांकडे स्थलांतरित होत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील माळहिप्परगा, रावणकोळा, अतनूर, गव्हाण, चिंचोली, शिवाजीनगर तांडा, पोमा तांडा, फकरु तांडा, भवानीनगर तांडा, शेलदरा, वांजरवाडा, केकतशिंदगी, उमरगा रेतू, वडगाव, सोनवळा, मंगरूळ, लाळी खु., लाळी बु. आदी गावांमध्ये मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या तालुक्यात शेतीकामेही नाहीत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे.
गावागावांत कामे उपलब्ध करा...
जळकोट तालुका हा खरिपाचा म्हणून ओळखला जातो. सध्या शेतीतही काही कामे नाहीत. त्यामुळे शासनाने रोहयोअंतर्गत तसेच वनविभाग, तहसील, कृषी कार्यालयामार्फत कामे सुरू करावीत. गाव तिथे मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे. मजुरांच्या मुलांचे शिक्षण मोफत करावे. मजुरांचे स्थलांतर थांबवावे, अशी मागणी हरिभाऊ राठोड, संजय हांडे, सुभाष भोसले, रमेश पारे, नागनाथ शेट्टी, अनिल गायकवाड, संग्राम कदम, माधव होनराव, प्रहार संघटनेचे अध्यक्ष संग्राम गायकवाड यांनी केली आहे.