इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आल्याने या देशातून आपल्याकडे आलेल्या व्यक्तींची विशेष तपासणी केली जात आहे. नोव्हेंबर महिन्यात ५ आणि डिसेंबर महिन्यात २ असे एकूण ७ जण इंग्लंडहून जिल्ह्यात आले आहेत. या सातही जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. १ मार्चपूर्वी मात्र १९ जण जिल्ह्यात आले होते. तर १ मार्चनंतर १०७ जण परदेशातून आले आहेत. त्यांचाही अहवाल त्या काळात निगेटिव्ह आला. जिल्ह्यात परदेशातून आलेल्या एकाही व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला नाही, ही दिलासादायक बाब आहे. नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क असून, खबरदारी म्हणून परदेशातून आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात आहे.
सर्वांचे अहवाल निगेटिव्ह
राज्य व केंद्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशातून आलेल्या व्यक्तींची नोंद करण्यात आली आहे. १ मार्चपूर्वी १९ आणि १ मार्चनंतर १०७ जण परदेशातून आले. नोव्हेंबरमध्ये ५ आणि डिसेंबरमध्ये २ असे एकूण ७ यात्रेकरू लंडनहून आले आहेत. या सर्वच यात्रेकरूंचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आहे. ब्रिटनच्या पार्श्वभूमीवर परदेशातून आलेल्यांची तपासणी केली जाते.
- डाॅ. गंगाधर परगे,
जिल्हा आरोग्य अधिकारी, लातूर
मार्चपासून विदेशातून एकूण १०७ जण आले
१२६ जिल्ह्यात आतापर्यंत परदेशातून आले आहेत. यातील १९ जण १ मार्चपूर्वी तर १०७ जण १ मार्चनंतर आले आहेत. या सर्वांची आलेल्या काळात कोरोना चाचणी करण्यात आली असून, विदेशातून जिल्ह्यात आलेल्या सर्वच यात्रेकरूंचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. मात्र यातील एकाही रुग्णाला परदेश प्रवासाचा इतिहास नव्हता. ज्यांना परदेश प्रवासाचा इतिहास आहे, ते सर्व निगेटिव्ह आहेत.
विदेशातून येणाऱ्यांची अशी होते तपासणी
विदेशातून येताना चाचणी झाली असेल आणि ७२ तासांत तो देशात आला असेल आणि अहवाल निगेटिव्ह असेल तरीही होम क्वारंटाईन करण्यात येते. ब्रिटनच्या पार्श्वभूमीवर जर या देशातून आलेल्या व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला, तर त्याचे सॅम्पल पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले जाते. अहवाल निगेटिव्ह असला तरी १४ दिवस क्वारंटाईन आणि १४ दिवस सदर व्यक्तीला स्वत: काळजी घेण्याबाबतचा सल्ला दिला जातो. आपल्याकडे ब्रिटनहून आलेल्या सातही जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे.