कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या २०१४-१५ या आर्थिक वर्षात बड्या टॉप टेन थकबाकीदारांकडून एक रुपयाचीही वसुली झालेली नाही. ही वसुली न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने बॅँकेला वसुलीबाबत काहीच हातपाय हलविता आले नाहीत. ‘एन. पी. ए.’ तरतुदीमधील वसुली न झाल्याने बॅँकेचा संचित तोटा १०० कोटींवर आहे. यावर्षी बॅँकेला २५२ कोटींची तरतूद करावी लागणार आहे. बड्या थकबाकीदारांमुळे जिल्हा बॅँक अडचणीत आली. गेल्या पाच वर्षांत प्रशासकांनी दत्त-आसुर्ले साखर कारखान्याची वसुली करून बॅँकेला अतिदक्षता विभागातून बाहेर काढले; पण बॅँक अजूनही सदृढ झालेली नाही. गेल्या वर्षभरात बॅँकेच्या प्रशासनाने वसुलीबरोबर व्यवहार वाढविण्यासाठी प्रयत्न केले. बॅँकेच्या ठेवी व कर्जे वाढली; पण वसुली झाली नाही. मोठ्या थकबाकीदारांकडून वसुली होणे अपेक्षित होते. ती झाली नसल्याने बॅँक अजूनही रुळांवर येऊ शकलेली नाही. दौलत सहकारी साखर कारखान्याकडून ६० कोटी येणे आहे. कारखान्याचा ताबा न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने पेच निर्माण झाला होता. आता न्यायालयीन पेच सुटला, चालविण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली; पण हा प्रश्न लवकर मार्गी लागेल, याबाबत साशंकता आहे. गायकवाड कारखाना चालविण्यास दिला, हंगाम संपला तरी बॅँकेचे पैसे आले नाहीत. तंबाखू समूह, मका स्टार्च, भुदरगड नागरी पतसंस्था अशा विविध संस्थांकडून वर्षभरात एक रुपयाची वसुली झालेली नाही. परिणामी बॅँकेचा एन. पी. ए. कमी झालाच नाही. या आर्थिक वर्षात बॅँकेला सुमारे २५२ कोटींची एन. पी. ए.ची तरतूद करावी लागणार आहे. रिझर्व्ह बॅँकेने मार्च २०१५ पर्यंत बॅँकेला सात टक्के सी. आर. ए. आर. पूर्तता करण्याचे आदेश दिले होते. या आर्थिक वर्षात बॅँकेचा सी. आर. ए. आर. आठ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मार्च २०१७ पर्यंत तो नऊ टक्क्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. प्रशासकांनी प्रशासकीय खर्चाला कात्री लावल्याने हा खर्च तीन टक्क्यांपेक्षा खाली येऊ शकतो. भुदरगड नागरी पतसंस्थेकडे सुमारे १३ कोटींचे येणे बाकी आहे. पतसंस्थेच्या जागा विक्रीतील पैसे जमा आहेत; पण न्यायालयाच्या आदेशाशिवाय काहीच व्यवहार करता येत नसल्याने वसुली होऊ शकलेली नाही. यासाठी बॅँकेने सहकार आयुक्तांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. हे १३ कोटी वसूल झाले, तर बॅँकेचा संचित तोटा ९४ कोटींपर्यंत राहू शकतो, अन्यथा तो १०० कोटींच्या पुढे जाईल, असे समजते. बॅँक अजूनही सक्षम झालेली नाही, तोपर्यंत बॅँकेची निवडणूक लागल्याने येणाऱ्या संचालक मंडळासमोर आव्हानांचा डोंगर आहे. संचालकांनी आपली मानसिकता बदलून काम केले, तरच आगामी वर्ष-दोन वर्षांत बॅँक पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.(प्रतिनिधी)
'बड्या' थकबाकी वसुलीविनाच वर्ष सरले
By admin | Updated: April 8, 2015 00:35 IST