इचलकरंजी : अनैतिक संबंधाच्या कारणावरून झालेल्या वादात महिलेच्या डोक्यात खलबत्ता घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एकास अटक केली आहे. रूपाली मोहन सनमुख (वय २८, रा. हॉटेल उपवनच्या मागे) असे जखमी महिलेचे, तर खुदबुद्दीन अल्लाउद्दीन इनामदार (३३) असे अटक केलेल्याचे नाव आहे. महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोल्हापूर रोडवरील हॉटेल उपवनच्या पिछाडीस महमंद नबीसो गरगरे यांच्या घरात रूपाली आणि खुदबुद्दीन हे दोघे गत सहा वर्षांपासून भाडेकरू म्हणून राहण्यास आहेत. रूपाली ही मुळची ताकवे (ता. बत्तीस शिराळा जि. सांगली) येथील आहे. त्याठिकाणी रूपालीची आई व तेरा वर्षांची मुलगी या दोघी राहतात. तर शहरातील बंडगरमाळ येथे खुदबुद्दीन याची आई व भाऊ राहतात. तो रेडीमेड कपडे विक्रीचा व्यवसाय करीत होता. रूपाली हिचे सासर कासेगाव येथील असून, तिचा पती मोहन सनमुख हा मृत झालेला आहे. काल, शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास खुदबुद्दीन हा आपले मित्र हरीश सुर्वे, संदीप व रोहित (पूर्ण नावे समजू शकली नाहीत) यांच्यासह घरी आला. रूपाली जेवण करीत असताना सर्वजण मद्यप्राशन करीत बसले होते. थोड्या वेळाने सर्वांनी मिळून जेवण केले व मित्र निघून गेले. त्यानंतर खुदबुद्दीन याने रूपालीकडे तू सागर लाखे याच्याशी अनैतिक संबंध का ठेवतेस, अशी विचारणा केली असता त्यावरून दोघांत वादावादी सुरू झाली. यावेळी रागाच्या भरात रूपालीने खलबत्ता उचलून खुदबुद्दीन याला मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने तो खलबत्ता हिसकावून घेऊन रूपालीच्या डोक्यात घातला. त्यामध्ये ती गंभीर जखमी होऊन खाली पडली. ती जिवंत असल्याचे पाहून त्याने ओढणीने तिचे नाक व तोंड दाबून धरले. त्यानंतर खुदबुद्दीन याने आपला भाऊ इमामुद्दीन याला फोन करून पत्नीला ठार मारले असल्याचे सांगितले. त्यानंतर तो स्वत:हून शिवाजीनगर पोलिसांत हजर झाला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिला प्रथमत: पालिकेच्या आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आले. (प्रतिनिधी)
महिलेच्या डोक्यात घातला खलबत्ता
By admin | Updated: June 29, 2014 01:09 IST