कोल्हापूर : गुन्ह्यातील चौकशीसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आणलेल्या महिलेने स्वत:च्या हातावर ब्लेडने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज शुक्रवार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात घडली. यमुना विजय साळोखे (वय ४०, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) असे या संशयित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसात संशयित यमुना साळोखे हिच्यावर आत्महत्येचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरोली पुलाची येथील संशयित यमुना साळोखे हिला एका गुन्ह्यासाठी पोलिसांनी चौकशीसाठी आणले. तिला कसबा बावडा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयामधील एलसीबीच्या खोलीमध्ये ठेवले होते. त्यावेळी तिने स्वत: हातावर ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात ती जखमी झाली. तिला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात आणले. तिच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, यमुना साळोखे हिला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता तिची जामिनावर मुक्तता करण्यात आली. यानंतर पुन्हा पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. याची नोंद शाहूपुरी पोलिसात झाली आहे. (प्रतिनिधी)
महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: July 12, 2014 00:59 IST