लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : काेल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून, चार दिवसांतच शिवार गारठलं आहे. बांध फुटीसह पाणी तुंबीमुळे अनेक ठिकाणचे पेरणी केलेले भात वाहून गेले आहे, तर काही ठिकाणी भातबियाणे कुजल्याने मोठे नुकसान झाले आहे. सरीत पाणी तुंबल्याने उसाच्या मुळांचा आधार तुटल्याने ऊस आडवे झाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडील दहा-पंधरा वर्षांत खरीप पेरणीचे वेळापत्रक काहीसे बदलले आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यांपर्यंत भात, ज्वारी, सोयाबीन, भुईमुगाची पेरणी होते. साधारणत: ‘मृग’ नक्षत्रात पाऊस सुरू होतो, मात्र त्याला जोर नसायचा. जूनच्या शेवटचा आठवडा अथवा जुलैपासून पावसाला जोर येत होता. मात्र, यंदा वरुणराजाचा मूड काही वेगळाच दिसत आहे. माॅन्सूनची सुरुवात कोल्हापुरात वेळाने झाली, सुरू झाला तो दमदारच. गेल्या चार दिवसांत धुवाधार पाऊस कोसळत असल्याने सगळीकडे पाणी पाणी झाले आहे.
माॅन्सूनच्या अगोदर वळिवाच्या पाऊस जोरदार झाला होता. त्यात आता सुरू झाला तो थांबण्याचे नाव घेत नसल्याने जमिनीत पाणी मुरायला वेळच मिळत नाही. त्यामुळे पाणी सगळीकडे सैरभैर झाले आहे. वाट मिळेल तिकडे पाणी पळत आहे. शिवारात पाणी थांबेना, त्यातून बांध फुटी मोठ्या प्रमाणात झाली आहे. धूळवाफ पेरणी झालेल्या भाताची उगवण झाली आहे, मात्र ते सगळे पाण्याखाली गेले आहे. जे उगवावयचे आहे, ते कुजले आहे.
उसाच्या सरीत पाणी तुंबल्याने त्याच्या मुळांचा आधार तुटल्याने ऊस कोलमडले आहेत. नऊ-दहा महिने जोमाने वाढवलेला ऊस आडवा झाला आहे. अजून तीन-साडे तीन महिने पावसाळा असल्याने हा ऊस तग धरणार का? या विवंचनेत शेतकरी आहे. आतच पिके गारठल्याने त्याच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
दुबार पेरणीचे संकट
नदी, ओढ्यांच्या काठावरील खरीप पेरणी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. इतर ठिकाणांवरील भात, ज्वारी, भुईमुगाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.
खताचा मिरगी डोस वाया जाणार
जिल्ह्यात साधारणत: जूनच्या पहिल्या पंधरावड्यात उसाला रासायनिक खताचा डोस दिला जातो. डोस दिल्यानंतर एकदमच पावसाला सुरुवात झाल्याने टाकलेले खत पिकाला लागण्यापूर्वीच ते वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झालेे आहेत.
सुगी लांबण्याची शक्यता
पेरणी केलेले भात, भुईमुगाचे बियाणे कुजल्याने नव्याने पेरणी करावी लागणार आहे, तर इतर ठिकाणी भुईमुगाची अद्याप पेरणीच करता आलेली नाही. त्यामुळे सुगी लांबण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.