लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेल्या १५ पैकी दोनच रेल्वे गाड्या सुरू आहेत. त्यामुळे नियमित पुणे, मुंबई, मिरज असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. याशिवाय दुहेरीकरण, प्लॅटफार्म बांधणी, जादा रेल्वेगाड्या, आदी प्रश्न रखडले आहेत. त्यामुळे केंद्रात या प्रश्नी खासदारांनी आवाज उठवावा, अशी मागणी रेल्वे प्रवाशांतून होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्च २०२० रोजी बंद झालेल्या १५ रेल्वे गाड्यांपैकी केवळ महाराष्ट्र एक्सप्रेस व कोयना एक्सप्रेस या दोनच रेल्वेगाड्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. विशेषत: कामानिमित्त मुंबई, पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांपैकी ७५ टक्के प्रवाशांचा कल रेल्वेने प्रवास करण्याकडे आहे. मात्र, अत्यल्प गाड्यांमुळे त्यांना खासगी बसेस, एस.टी.चा आसरा घ्यावा लागत आहे. मिरज-पुणे मार्गावर दुहेरीकरणाचे काम रखडल्यामुळे होऊ घातलेल्या कोल्हापूर-पुणे पॅसेंजरची वाट आणखी खडतर झाली आहे. शाहू छत्रपती टर्मिनस अर्थात कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा विकासही रखडला आहे. रेल्वेगाड्या सुरू नसल्यामुळे कोल्हापूर विभागाचा महसूलही घटला आहे. येत्या काळात रेल्वेचे पुणे महाव्यवस्थापक संजीव मित्तल हे कोल्हापूर स्थानकास भेट देणार आहेत. त्यांनी तरी लक्ष देऊन या समस्या सोडवाव्यात. नाही तर खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मांडून कोल्हापूरकरांना कायमचे समस्यामुक्त करावे, अशी मागणी संतप्त रेल्वे प्रवाशांकडून होत आहे.
या समस्यांकडे दुर्लक्ष
- कोल्हापूर-मुंबई (सह्याद्री), कोल्हापूर-सोलापूर, कोल्हापूर-हैदराबाद, कोल्हापूर-बिदर या चार गाड्या सुरू व्हाव्यात.
- सर्वाधिक नोकरदार, विद्यार्थी प्रवासी वर्गाची मागणी - मिरज, कोल्हापूर-सातारा पॅसेजर सुरू करा.
- रखडलेले मिरज-पुणे लोहमार्ग दुहेरीकरण त्वरित पूर्ण करा.
- कोयनासह सर्वच रेल्वेगाड्यांचा गांधीनगर थांबा पूर्ववत सुरू करा.
- कोल्हापूर रेल्वेस्थानकातील प्लॅटफार्म क्रमांक ४, ५, ६ चे रखडलेले बांधकाम पूर्ण करा.
- सुट्टीच्या जादा गाड्यांचे नियोजन करा.
- मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कोल्हापूरकरांना दुय्यम दर्जाची वागणूक थांबावावी.
कोट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेल्या रेल्वेमुळे कोल्हापूरचा विकास खुंटला आहे. विशेषत: नोकरदार, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे सर्व रेल्वे पूर्ववत सुरू कराव्यात.
- शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती